Press "Enter" to skip to content

जे.एन.पी.टी. विरोधात उपोषण

जसखार गावच्या विविध समस्यांविषयी युवा सामाजिक संस्था व ग्रामस्थांचे जे. एन.पी.टी. विरोधात एक दिवसीय उपोषण

सिटी बेल ∆ तृप्ती भोईर ∆ उरण ∆

उरण तालुक्यातील जसखार ता.उरण जिल्हा रायगड येथील युवा सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांचे जे.एन.पी.टी प्रशासन जसखार गावावर करीत असलेल्या अन्याय आणि दडपशाही विरोधात आज बुध‌वार दिनांक १५ जून २०२२ रोजी सकाळी १०-०० ते ०५-०० लाक्षणिक उपोषण करण्यात आले असून जे.एन.पी.टी कडून होणा-या विकास कामाच्या आड जसखार गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून अनेक वेळा जे.एन.पी.टी प्रशासनाशी भेटीगाठी घेऊन,पत्रव्यवहार करून देखील कोणतीही दखल घेताना दिसत नाहीत.

जसखार गावासह संपूर्ण रायगड नव्हे-नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान असणा-या श्री रत्नेश्वरी मातेच्या मंदिराच्या बाजूने होत असलेल्या ब्रिज आणि रस्त्याच्या कामामुळे या भव्यदिव्य मंदिराची पडझड होत असून मंदिराला कायमस्वरुपी धोका निर्माण होणार असून सदर ब्रिज,रस्ता आणि रेल्वेपटरी वरून होणा-या वाहतुकीमुळे जसखार गावातील घरांना धोका निर्माण होऊ शकतो त्याच प्रमाणे गावातील मुले,महिला,जेष्ठ नागरिकांना चोहू बाजूने असणा-या हायवे रस्त्यांमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. म्हणून येथील जसखार गावच्या युवा सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी उपोषण केले.

ग्रामस्थांच्या मागण्या

१) श्री रत्नेश्वरी देवीच्या मंदिराची जबाबदारी जे.एन.पी.टी प्रशासनाने घ्यावी तसे लेखी स्वरूपात लिहून द्यावे .
२)जसखार गावाच्या दोन्ही बाजूने जाणारे उड्डानपुल,महामार्ग तसेच रेल्वेट्रैक मुळे श्री रत्नेश्वरी देवीचे मंदिर त्या परिसरातील बाधीत वास्तुची जबाबदारी जे.एन.पी.टी प्रशासनाने स्विकारून कायम स्वरूपी संरक्षणाची हमी लेखी स्वरूपात द्यावी.
३) यश बाळू शेळके या मुलाला इलेक्ट्रीक शाॅक लागून अपंगत्व आले असून त्याची संपुर्ण जबाबदारी जे.एन.पी.टी ने घ्यावी.
४) मागील चार वर्षे जे.एन.पी.टी प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे गावात पावसाचे पाणी शिरून ग्रामस्थांचे झालेले नुकसान भरपाई त्वरीत द्यावी .
५) बी.एम.सी.टी पोर्ट आणि रेल्वे प्रकल्प तसेच जसखार ग्रामपंचायत हद्दीत सेझ प्रकल्पामुळे गावात अनेक समस्या व भविष्यात त्रास सहन करावा लागणार असल्याने त्या प्रकल्पामध्ये जसखार गावातील तरूण/तरूणीनां नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे .
६) जसखार गाव ते सोनारी गावांना जोडणारा पारंपारीक रस्ता लवकरात लवकर स्काय वाॅक किंवा भूयारी दुचाकी वाहन जाईल अशी व्यवस्था करण्यात यावी ‌.
७) जसखार गावच्या ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
८) भविष्यात गावात पावसाचे पाणी साचू नये याची उपाययोजना करावी आणि जर पाणी गावात भरले तर आणि जर ग्रामस्थांच्या घरात पावसाच पाणी जाऊन नुकसान झाले तर सर्व जबाबदारी जे.एन.पी.टी ने घेऊन नुकसानभरपाई द्यावी.

अशा या सतत भेडसावणा-या समस्यांचे निवारण त्वरीत करण्यासाठी तसेच जे.एन.पी.टी प्रशासनाला जाग आणण्यासाठी लाक्षणिक उपोषणास अ‌ॅडमिनीस्ट्रेशन बिल्डींग चौक जे.एन.पी.टी येथे करण्याचा निर्धार करून आज युवा सामाजिक संस्था जसखार आणि ग्रामस्थ मंडळ जसखार लाक्षणिक उपोषणास बसले आहेत .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.