Press "Enter" to skip to content

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठाकडून चाललाय राज्यव्यापी उपद्व्याप

अकृषक व अभियांत्रिकी महाविद्यालयांना समाविष्ट करण्याचा घाट अन् अत्यल्प वेतनामध्ये कंत्राटी नोकरभरतीचाही महाप्रताप

सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तंत्रशास्त्र विद्यापिठाचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय आरोग्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या प्रयत्नाने साकार झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठामध्ये एकीकडे राज्यातील अकृषक विद्यापिठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश करण्याचा खटाटोप राज्यसरकारच्या माध्यमातून सुरू असून दुसरीकडे या विद्यापिठातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी ‘वॉक इन इंटरव्हयू’चे आयोजन कंत्राटी पध्दतीने येत्या आठवडयात करण्यात येऊन अत्यल्प वेतनामध्ये कर्मचारी 11 महिन्यांसाठी नियुक्त करण्याचे राज्यव्यापी प्रयत्न सुरू झाले आहेत.

राज्यसरकारच्या सुचनेनुसार प्रत्येक विद्यापिठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठाचे उपकेंद्र सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने भाडेतत्वावर विद्यापिठांनी जागा दिली आहे.मात्र, विद्यापिठांच्या अखत्यारीतून अभियांत्रिकी महाविद्यालये ‘बाटू’कडे वर्ग झाल्यास राज्यातील विविध विद्यापिठांना महसुलासह अनेक बाबींचा फटका बसण्याची लक्षणे दिसून येत असल्याने राज्यसरकारच्या या धोरणाला विरोध होत असून अजूनतरी हा विरोध उघडपणे चर्चेत आलेला नाही.

बाटूमध्ये राज्यातील 67 अभियांत्रिकी महाविद्यालये वर्ग झाली आहेत. याम मुंबई विद्यापिठांतर्गत 1, पुणे विद्यापिठांतर्गत 30, नागपूर विद्यापिठांतर्गत 9 आणि औरंगाबाद विभागातील 27 महाविद्यालयांचा समावेश आहे.सोलापूर आणि नागपूर विद्यापिठांमध्ये बाटूचे उपकेंद्र उभारण्याकामी विद्यापिठांची जागा मागण्यात आली आहे.

राज्यातील विविध विद्यापिठांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती झाली नसताना बाटूच्या उपकेंद्रालाही कर्मचारी पुरवण्याची सूचना राज्यसरकारकडून संबंधित विद्यापिठांना करण्यात आली असून राज्यातील या विद्यापिठांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्काच्या माध्यमातून 60 ते 65 कोटींच्या महसूलापैकी सुमारे 70 टक्के महसूल या धोरणामुळे ‘बाटू’कडे वर्ग होणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठाची निर्मिती राज्य शासनाने केली असून अन्य विद्यापिठांप्रमाणे ‘बाटू’ ला स्वायत्तता असूनही राज्यातील सत्ताधारी पक्षाचे या डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठावर नियंत्रण असणार आहे. भविष्यात राजकीय आखाडयाचे आणि मलिदा खाण्याचे कुरण असे बाटूचे स्वरूप होऊ नये तसेच राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये डबघाईस येऊ नयेत, यासाठी राज्यसरकारने धोरणातील दुराग्रह सोडण्याची कुजबूज स्वरूपातील चर्चा या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संस्थाचालकांनी केली आहे.

अत्यल्प वेतनातील नोकरभरतीसाठी ‘वॉक इन इंटरव्हयू’चे आयोजन

कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात असलेल्या लोणेरे आंबर्ले परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठामध्ये नुकताच 6 जून 2022 पासून अत्यल्प वेतनातील नोकरभरतीसाठी ‘वॉक इन इंटरव्हयू’चा प्रकार सुरू झाला असून यामध्ये प्राध्यापक वर्गाच्या 30 हजार पगाराच्या 63 जागा, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी व सहायक जनसंपर्क अधिकारी या प्रत्येकी एक जागा, 3 ज्युनियर सिव्हील इंजिनियर, 1 इलेक्ट्रीकल ज्युनियर इंजिनियर, 10सॉफ्टवेअर इंजिनियर, 2 स्पॉट इंस्ट्रक्टर, 3 मेडीकल ऑफिसर, 5 अकाऊंटंट, 5 सिव्हील सुपरवायझर, 1 इलेक्ट्रीकल सुपरवायझर, 1 गार्डन सुपरवायझर, 4 वर्कशॉप इन्स्ट्रक्टर, 8 होस्टेल क्लर्क, 2 नर्स, 32 क्लार्ककम टायपिस्ट डाटा एन्ट्री ऑपरेटर, 11 लॅबरोटरी असिस्टंट, 4 ड्रायव्हर, 4 लायब्ररी असिस्टंट, 3 लायब्ररी ट्रेनी आणि 2 लायब्ररी अटेंडंट अशा एकूण 167 जागांसाठी ‘वॉक इन इंटरव्हयू’ होणार असल्याचे सोशल मिडीयाद्वारे व्हायरल झालेल्या पीडीएफ फाईलवरील जाहिरातवजा माहितीवरून सर्वाना समजून आले आहे.

एकीकडे राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना त्यांच्या विद्यापिठांपासून तोडून बाटूशी संलग्न करण्याचा घाट राज्यसरकारने घातला असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठामध्ये एवढया मोठया प्रमाणावर नोकरभरतीचा प्रयत्न सुरू असून अत्यल्प वेतन आणि केवळ 11 महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती या प्रकारामुळे ‘युज ऍण्ड थ्रो’ची धास्ती या सर्व नोकरभरतीमधील उच्चशिक्षितांना राहणार असल्याने शासनाने अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संलग्नतेचे धोरण अवलंबिण्यापूर्वी नोकरभरतीचे धोरण जाहिर करण्याची आवश्यकता असल्याचे याच क्षेत्रातील अनेकांकडून बोलले जात आहे. मात्र, या सगळया प्रकारात कोकणातील गुणवत्ताधारक नोकरभरतीपासून अत्यल्प वेतनामुळे दूर राहून परजिल्ह्यातील अथवा परविभागातील नोकरभरती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.