Press "Enter" to skip to content

कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन

‘हे मानवा तू मानवता सोडू नको रे..’ — कल्याण कारागृहातील बंदीजनांचे सादरीकरण

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

संतांनी दाखविलेल्या मार्गाने जायचे असा विचार जरी मनात आला तरी मनुष्याच्या आयुष्यात किती अमूलाग्र बदल होतात याची प्रचिती आज नव्याने आली. कारागृहातच एका बंदीजनाला सुचलेले ‘हे मानवा तू मानवता सोडू नको रे..’ हे काव्य इतर बंदीजन जेव्हा सादर करतात तेव्हा त्याला स्पर्धेचे यशच म्हणावे लागेल.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज कल्याण जिल्हा कारागृहातील बंदीजनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत संतरचना सादर केल्या. ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’, ‘सद्‌‍ गुरू वाचून सापडेना सोय’ आणि ‘ज्ञानीयाचा राजा’ या रचना बंदीजनांनी सादर केल्या.

जिल्हा कारागृह अधीक्षक ए. एस. सदाफुले, तुरुंग अधिकारी भास्कर कचरे, पी. डी. रनाळकर तसेच शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संजीव मिसाळ, शंकर धुमाळ, दक्षिण संपर्कप्रमुख पत्रकार राकेश खराडे,संगीत शिक्षक तुकाराम लोभी आदी उपस्थित होते.

बंदीजन संतविचार अंगिकारतील ‌ ‌ तुकोबारांच्या विचाराने प्रेरित होऊन, मानव कल्याणाचा विचार मनात ठेवून, संतांनी दाखविलेल्या मार्गाने बंदीजन भविष्यात मार्गक्रमण करतील आणि कारागृहाबाहेरील आयुष्य सुखासमाधानाने जगतील असा विश्वास आहे.
ए. एस. सदाफुले, अधीक्षक, कल्याण कारागृह

हे वारकरी संप्रदायाचे यश
‌ कुटुंबप्रमुख आणि कुटुंबव्यवस्था याचा भास कारागृहामध्ये आल्यानंतर होतो. कुटुंबप्रमुख म्हणून कारागृहप्रमुख नेहमीच बंदीजनांना वारकरी संप्रदायाच्या शिकवणुकीप्रमाणे घरासारखी वागणूक देतात हेच वारकरी संप्रदायाचे यश आहे.
– लक्ष्मीकांत खाबिया, स्पर्धा प्रमुख

संतविचार मानवासाठी उपयुक्त
‌ संतांचे विचार हे माणसाला माणूस म्हणून वागायला शिकवितात हे शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानने बंदीजनांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेमुळे समजले, अशी प्रतिक्रिया सिद्धेश पांचाळ या बंदीजनाने व्यक्त केली. तर अमर देसले म्हणाले, अभंग, कीर्तनामुळे तणावमुक्त राहण्यास मदत झाली. बंदीजनांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेमुळे जीवनाची नवीन वाट दिसू लागली आहे. कृष्णा गोडांबे म्हणाले, स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे मी आपल्या समाजाची सेवाच करतो आहे, असे मनात भाव दाटून आले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.