Press "Enter" to skip to content

पाली शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यात प्रशासन अपयशी

पालीत सुट्ट्यांमध्ये हजारो भाविक व पर्यटक दाखल, शनिवार व रविवार पाली हाऊसफुल

राजकारण्यांनो पालीची वाहतूक कोंडी समस्यां सोडवा, संतप्त जनतेचे आवाहन

अवजड व डंपर वाहतुकीने कोंडी जटिल, अपघाती घटनाही वाढल्या

सिटी बेल ∆ पाली/बेणसे ∆ धम्मशील सावंत ∆

सुट्ट्यांमध्ये अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक दाखल होत आहेत. भाविक व पर्यटकांची वाहने, तसेच इतर अवजड वाहने व डंपर यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी जटिल होत आहे. दिवसा आणि रात्री देखील कोंडी होत असते. परिणामी पर्यटक, भाविक व नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.

पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त व विद्यार्थी शाळा व कॉलेजमध्ये येत असतात. परिणामी कोंडीमुळे वाहनचालक, भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची येथून वाट काढतांना मोठी गैरसोय होते.

अरुंद रस्ते व भाविकांची वाहने यामुळे वाहतुक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाल्याचे दिसून येते. वाहतूक कोंडी ने डोकेदुःखी वाढली आहे. यावर ठोस उपाय निघत नसल्याने सारे त्रासले आहेत. प्रशासन वाहतूक कोंडी सोडविण्यात अपयशी ठरल्याने राजकारण्यांनो पालीची वाहतूक कोंडी समस्यां सोडवा, असे आवाहन आता जनता करू लागली आहे.

विशेषत: पालीत अवजड वाहतूक त्रास दायक ठरत आहे. अनेकदा रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकत असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. रुग्ण वेळेत पुढील दवाखान्यात पोहचण्यास विलंब होत आहे. पालीत सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय असलेला बायपास (मार्ग ) केवळ घोषणेत अडकल्याचे दिसत आहे. पाली शहरातील वाहतूक समस्येमुळे येथील रस्ते हे एकेरी करण्यात आले असून श्री बल्लाळेश्वर मंदिर येथे व विळे भागाड माणगाव कडे जाणाऱ्या या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे पाली शहरातील वाहतूक समस्या ही जटिल होत चाललेली आहे.

वाहतूक समस्येचा स्थानिक प्रवाशांना तसेच भाविकांना त्रास न होणेकरिता शहरातील महत्वाचे नाके येथे प्रशासनाकडून वाहतूक पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येत असते. पाली शहरास वर्तुळाकृती बाह्यवळण रस्ता असा रस्ता कोणत्याही योजनेतून मंजूर नाही . परंतु पाली पाटनुस रस्ता रा.मा. 94 या रस्त्यास पर्यायी रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत प्रस्थावित आहे. पाली पाटनुस रस्त्यास पर्यायी पाली गावातून वळण रस्ता करणे कि. मी 00/00 ते 3/00 या कामाकरिता जमीन भूसंपादन करणे या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

पाली गावास पाली पाटनुस रस्ता रा.मा 94 या रस्त्यास पर्याय रस्ता करणे या कामास प्रशासकीय मान्यता असून, सदर कामासाठी लागणाऱ्या जागेची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादन करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही शक्य असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते. मात्र अद्याप पाली बलाप बायपास मार्ग प्रक्रियेला कोणत्याही प्रकारची गती मिळताना दिसत नाही, परिणामी भूसंपादन च होत नसेल तर बायपास चे काम कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित होतोय.

दरम्यान पालीत सण व उत्सवात देखील हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होताना दिसतात. त्यामुळे येथे वारंवार वाहतुक कोंडी होत असुन भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पालीच्या बाहेरुन बलाप गावापासून पर्यायी (बायपास) मार्गाला मंजुरी असुनही हा बाह्यवळण(बायपास) मार्ग लालफितीत अडकला आहे. पालीला वाहतुक कोंडीचे ग्रहण लागले आहे. त्याचप्रमाणे परळी बाजारपेठ देखील सतत वाहतुक कोंडीच्या विळख्यात सापडलेली दिसते. या वाहतुक कोंडीतून सुटका होईपर्यंत सारेच रडकुंडीला येताना दिसतायेत.

खाजगी, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरूंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यामूळे पालीत सतत वाहतूक कोंडी असते. सुट्टयांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येवुन वारंवार अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे. या समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज वर्तविली जातेय.

कोंडीची ठिकाणे :
बल्लाळेश्वर मंदिर ते ग.बा. वडेर हायस्कूल, मारुती मंदिर चौक ते जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक ते बाजारपेठ, कुंभार आळी, बँक ऑफ इंडिया, हटाळेश्वर चौक ते मिनिडोअर स्टँड, एसबीआय बँक ते गांधी चौक अशा विविध ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते.

कोंडीची कारणे :
पालीत डंपर, ट्रॅक्टर व लक्झरी वाहनांची नियमीत ये-जा सुरु असते. यामुळे वाहनांना येण्या जाण्याचा मार्ग मिळत नाही. तसेच नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक देखील वाहतूक कोंडीत भर घालतात. पालीतील रस्ते हे खूप अरूंद आहे. अशा अरुंद रस्त्याच्या दुतर्फा अनेकजण आपली दुचाकी व मोठी वाहने पार्क करतात व खरेदी किंवा इतर कामासाठी जातात. अनेक दुकाने, टपर्या व इमारती रस्त्याच्या अगदी कडेला आहेत. काही ठिकाणी तर अनधिकृत बांधकामे देखील बांधली गेली आहेत. याबरोबरच रस्त्याच्या बाजुला सुरु असलेली बांधकामे आणि या बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडलेले असते यामूळे येथून मार्ग काढणे वाहनचालकांना शक्य होत नाही. यामुळे देखिल पालीत सतत वाहतूक कोंडी होत असते. तसेच सुट्टयांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येवुन वारंवार अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध नाक्यांवर पोलीस तैनात असतात मात्र या कारणांमुळे कोंडी जटिल होते.

इतर वाहनांची वर्दळ :
मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था आणि वाहतुक कोंडी. त्यामुळे मुंबईवरून कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळेमार्गे माणगाव वरुन किंवा वाकण वरून पुढे जातात. तर कोकणाकडून येणारी वाहने माणगाव वरुन विळे मार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी पालीत वाहनांची रेलचेल वाढून अधिक वाहतूक कोंडी होते. बाह्यवळण मार्ग निर्माण झाल्यास हि वाहने पालीच्या बाहेरूनच निघून जातील त्यामुळे हि वाहतूक सुरळीत होऊ शकते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.