पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांचा दरडग्रस्त आंबेमाची व केवनाळे ग्रामस्थांतर्फे सत्कार
सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆
पोलादपूर तालुक्यातील विविध गावातील नळपाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती व नव्याने बांधण्यासह रस्त्याचे कामदेखील टप्प्याने पूर्ण करू, अशी ग्वाही आंबेमाची व केवनाळे ग्रामस्थांतर्फे सत्कार स्विकारताना रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी केवनाळे येथे दिली. यावेळी ना.अदिती तटकरे यांनी ग्रामस्थांना मधाचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असाल तर मी राज्याची पर्यटन राज्यमंत्री म्हणून नक्कीच सहकार्य करेन, असे मधाचे बोटही लावले.
रायगडच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी 22 व 23 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या आपत्तीजन्य परिस्थितीत पोलादपूर तालुक्यातील आपत्तीग्रस्त गावांचे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तसेच जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडयात दर रोज पोलादपूर तालुक्यातील आपत्तीग्रस्त गावांना भेट देऊन आपत्ती निवारणकामी प्रशासन ग्रामस्थ आणि आपत्तीनिवारण यंत्रणांना योग्य ते मार्गदर्शन करीत रसद पुरवून जनजीवन पूर्वपदावर आणले. यामुळे दरडग्रस्त आंबेमाची, केवनाळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांचा केवनाळे येथे सत्कार आयोजित केला.
याप्रसंगी महाड विधानसभा अध्यक्ष बाबू खानविलकर, जिल्हा सेवादल अध्यक्ष वाय.सी. जाधव, तालुका अध्यक्ष सुहास मोरे, माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अपेक्षा कारेकर, तालुका महिला अध्यक्षा प्रतिभा पवार, शहर अध्यक्ष अजित खेडेकर, राजाराम ओंबळे, प्रकाश कुमठेकर, राघू रेणोसे, कृष्णा करंजे तसेच महिला पोलीस पाटील मोरे, उद्यान पंडीत पुरस्कारप्राप्त रामचंद्र कदम, तहसिलदार दिप्ती देसाई तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्यानपंडीत शेतकरी कदम यांचा गौरवही पालकमंत्री ना.तटकरे यांच्याहस्ते करण्यात आला.
पालकमंत्री ना.तटकरे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्थानिक समाजसेवी मंडळी, सर्वपक्षिय मदतकर्ते आणि प्रशासनाच्या मदतीने या आपत्तीकाळात काम करण्याचे बळ प्राप्त झाल्यानेच या सत्काराचे महत्व अधिक असून या सत्कारामुळे वेगळीच ऊर्जा प्राप्त होत असल्याचे मत मांडले. पोलीस पाटील विमल मोरे यांनी यावेळी पालकमंत्री ना. तटकरे यांना बाळगणेशाच्या छायाचित्राची फ्रेम भेट दिली.
यावेळी ग्रामस्थांनी आंबेमाचीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था, गावात असणारी भीषण पाणीटंचाई, त्यासाठी लागणारा खर्च या सर्व समस्यांकडे ना.अदिती तटकरे यांचे लक्ष वेधून समस्यांची पूर्तता करण्यात यावी, अशी विनंती देखील केली.








Be First to Comment