रिलायन्स मधील भारतीय श्रमिक शक्ती संघाला माझे सर्वोतोपरी सहकार्य : खा. सुनील तटकरे
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे युनिटमध्ये नव्यानेच कार्यरत झालेल्या भारतीय श्रमिक शक्ती संघ युनियनला भविष्यात माझे सर्वोतोपरी सहकार्य राहील असे अभिवचन देत भारतीय श्रमिक शक्ती संघ या कामगार संघटनेला रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या शिष्टमंडळाने यावेळी खा. सुनील तटकरे यांचे आभार मानले.
कामगार न्यायालयातील प्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड. नितीन शिवकर, लढाऊ कामगार नेते दिपकभाई रानवडे व कामगार क्षेत्रातील धडाडीचे अभ्यासू नेते जिमी डे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे युनिट मध्येभारतीय श्रमिक शक्ती संघ ही संघटना नुकतीच स्थापन करण्यात आली आहे. रिलायन्सच्या नागोठणे युनिटमध्ये नव्यानेच कार्यरत झालेल्या या कामगार संघटनेच्या नामफलकाचा अनावरण सोहळा सोमवार दि. १६ मे, २०२२ रोजी रिलायन्स कंपनीच्या कुहिरे प्रवेश द्वारासमोर संपन्न होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार नेते दीपकभाई रानवडे यांच्या नेतृत्वाखाली खा. सुनील तटकरे यांची सुतारवाडी येथील “गीताबाग” मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. तेव्हा या कामगार संघटनेच्या माध्यमातून चांगले व सर्वोत्तम काम करा असा मोलाचा सल्लाही यावेळी खा. सुनील तटकरे यांनी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिला.
यावेळी कामगार नेते दीपकभाई रानवडे यांच्यासह भारतीय श्रमिक शक्ती संघचे जनरल सेक्रेटरी प्रमोद मोरे, कार्याध्यक्ष अशोक भोय, उपाध्यक्ष प्रवीण दबडे, किशोर शिर्के, मनोज पेडवी, सहसचिव पंडित तुपकर, सल्लागार समिती मधील अॅड. महेश पवार आदी उपस्थित होते.
Be First to Comment