१० जून २०२२ ला ‘मजनू’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सिटी बेल • मनोरंजन प्रतिनिधी •
सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित ‘मजनू’ चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर मोठ्या दिमाखात पुणे येथे पार पडला, या प्रसंगी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली. आमदार सिद्धार्थ शिरोळे, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, पुणे जिल्हा ट्रॅफिक डीसीपी राहुल श्रीरामे यांच्या विशेष उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला निर्माते गोवर्धन दोलताडे, भारत चंगेडे, डॉ. दीपाली गर्जे-सानप यांच्यासह दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, चित्रपटातील कलाकार सुरेश विश्वकर्मा, रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे व तंत्रज्ञ उपस्थित होते.
टीझरमध्ये रोहन पाटील आणि स्वेतलाना अहिरे एकमेकांशी प्रेमळ संवाद साधत आहेत. “माझ्यासाठी तूच सोनं, नाणं, हिरे, मोती, धन दौलत …” अशा संवादाने सुरु होणाऱ्या या टिझरमुळे “मजनू” हा चित्रपट एक तरल प्रेमकहाणी असेल असे स्पष्ट होत असले तरी नितीश चव्हाण, सुरेश विश्वकर्मा व सहकलाकार यांच्या भूमिकेमुळे या प्रेमकहाणीत कोणते ट्विस्ट आणि टर्न्स येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट बघावी लागणार आहे.
‘मजनू’ बद्दल बोलताना दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले की, “शाळा संपवून कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्या नंतर तेथील बंधमुक्त आणि मौजमजेच्या वातावरणात वावरताना प्रत्येक युवक हा स्वतःला मजनू समजू लागतो मग ते शहर असो की गाव. प्रेमाची खरी ओळख सर्व तरुण, तरुणींना याच काळात होते, त्यांच्या या भावविश्वावर आधारित ‘मजनू’ हा चित्रपट फक्त प्रेमकहाणी नसून एक परिपूर्ण पॅकेज आहे. ‘मजनू’ मध्ये प्रेम, संघर्ष, सस्पेन्स, विरह यांसारखे अजूनही विविध पैलू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत, तसेच चित्रपटातील गाणी श्रवणीय असून ती प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच भुरळ घालतील.” ‘मजनू’ चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे, भारत चंगेडे, डॉ. दीपाली गर्जे-सानप असून कथा, पटकथा आणि संवाद गोवर्धन दोलताडे यांचे आहे. चित्रपटात नितीश चव्हाण, रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे, सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे, अरबाज शेख, प्रणव रावराणे, आदिती सारंगधर, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘मजनू’ चित्रपटाला संगीतकार पी. शंकरम, सचिन अवघडे, साजन – विशाल यांचे संगीत लाभले आहे तर गीतकार दीपक गायकवाड आणि गोवर्धन दोलताडे यांच्या गीतांना इंडियन आयडॉल फेम सलमान अली, आदर्श शिंदे, संदीप उबाळे, बेला शेंडे, आनंदी जोशी व विशाल चव्हाण यांचा स्वरसाज लाभला आहे. संकलन चेतन सागडे यांनी केले असून, कला दिग्दर्शक महेश कोरे, डिओपी एम. बी. अळ्ळीकट्टी, साउंड डिझायनर राशी दादा बुट्टे, कॉस्च्युम डिझायनर संदीप गाजुल, पार्श्वसंगीत विनीत देशपांडे यांचे तर कोरिओग्राफर हाईट मंजू आहेत. सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित ‘मजनू’ हा चित्रपट दि. १० जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Be First to Comment