Press "Enter" to skip to content

अंबा नदीचे पाणी झाले चिखलयुक्त

धरणातील पाणी सोडल्याने नदीत साचला चिखल : पालिकरांच्या नशिबी बाराही महिने दूषित पाणी

सिटी बेल • पाली/बेणसे • धम्मशील सावंत •

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहराला येथील अंबा नदीतून थेट पाणीपुरवठा केला जातो. मात्र हे पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याच्या तक्रारी कायम वाढतच आहेत. गुरुवारी अंबा नदीच्या पाण्यात अचानक चिखल व गाळ आल्याने पाणी प्रचंड गढूळ झाले होते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. उन्हेरे येथील धरणातील चिखलयुक्त पाणी सोडल्याने अंबा नदीचे पाणी गढूळ झाले होते.

चिखलामुळे अंबा नदीचे पाणी पूर्णपणे मातकट रंगाचे झाले होते. शिवाय असे गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांना आले. नळाद्वारे अचानक गढूळ पाणी आल्याने नागरीकांनी चिंता व्यक्त केली. अशातच रोज मरे त्याला कोण रडे, ही परिस्थिती याठिकाणी असून पालिकरांच्या नशिबी वर्षाचे बारा महिने दूषित पाणी असल्याचे वास्तव आहे.

याशिवाय अंबा दिला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प पालीत उपलब्ध नाही. तसेच तब्बल 20 कोटींची शुद्धपाणी योजना देखील लालफितीत अडकलेली आहे.

परिणामी भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे. आत्ता पर्यंत नळाच्या पाण्यातून साप, बेडूक, शंखशिंपले व मासे आदी प्राणी आले आहेत. याबरोबरच शेवाळ व चिखल हे नेहमीच येत असते. आजूबाजूच्या कारखान्यांतून प्रदूषित पाणी देखील अंबा नदीमध्ये सोडले जाते. अनेक नागरिक प्रदूषित पाणी पिण्यापेक्षा कूपनलिका व विहीरीचे पाणी पिण्यावर भर देत आहेत. बहुतांश जण विकतचे बाटलीबंद पाणी पितात. नियमित पाणीपट्टी भरून देखील लोकांना असे प्रदूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

उन्हेरे धरणातून चिखलयुक्त पाणी सोडल्याने अंबा नदीचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे. गाळ साचल्याने नदीचे पात्र अरुंद होईल. पावसाळ्यात पुराचा धोका संभवतो. तसेच हा गाळ पाणी खेचणाऱ्या मोटार पंपात जाऊन पंप बंद पडू शकतात. व त्यामुळे पालीकरांवर कृत्रिम पाणी टंचाईचे संकट येऊ शकते.
अमित निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, पाली

पाटबंधारे विभागाने बहुतेक उन्हेरे धरणातील पाणी नगरपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता अंबा नदीमध्ये सोडले आहे. त्यामुळे पाणी गढूळ झाले आहे. पाण्यात नगरपंचायतीद्वारे औषध टाकण्यात आले आहे. तसेच दोनतीन दिवसांत गाळ खाली बसेल. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे.
– सुलतान बेनसेकर, पाणीपुरवठा सभापती, पाली नगरपंचायत

उन्हेरे धरणाची जॅकवेल व तेथील दरवाजाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हा दरवाजा उघडल्याने धरणातील साठलेला काही गाळ पाण्यामार्फत अंबा नदीला मिळाला आहे. एक दोन दिवसांत हा गाळ खाली बसेल व पाणी स्वच्छ होईल.
– राकेश धाकतोडे, कार्यकारी अभियंता, कोलाड पाटबंधारे विभाग

शुद्ध नळपाणी योजना लालफितीत

शासनाने केलेल्या 2008 -09 च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण 7 कोटी 79 लाखाचा निधी व 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतू राजकीय श्रेयवादामध्ये हि योजना रखडली गेली. त्याबरोबर 10 टक्के लोकवर्गणीचा प्रश्न देखिल होता. मात्र पालीला ‘’ब’’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे. सद्य स्थितीत ही योजना 20 कोटींवर गेली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.