Press "Enter" to skip to content

उपजिल्हा रुग्णालयात हवी सुईण

उपजिल्हा रुग्णालयात सुईणींची नेमणूक करावी : समन्वय समिती सदस्य उदय पाटील यांची मागणी

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

गोरगरिबांना योग्य त्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे बांधली.कर्जत सारख्या आदिवासी बहुल भागात कशेळे येथे ग्रामीण रुग्णालय आणि कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालय बांधले.आरोग्य व्यवस्थेवर शासन दरवर्षी करोडो रुपये खर्च करते.येथील डॉक्टरांना लाखाच्या आसपास तर, नर्स आणि आरोग्य सेविकांना पन्नास हजाराच्या आसपास पगार दिला जातो.पण शासनाचा पैसा योग्य मार्गी लागतो का ? गोरगरिबांना नक्की आरोग्य सुविधा मिळतात का ? या बाबत ना प्रशासनाचे, लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही, सर्व व्यवस्थाच बेभरवशाचा झाली आहे अशी प्रतिक्रिया कर्जत तालुका समन्वय समिती सदस्य उदय पाटील यांनी सोशल मिडिया टाकली आहे.

कर्जत मधील डॉक्टर दिवसभरात हजारोंचा गल्ला जमवतात पण रात्री दवाखान्याच्या ठिकाणी न राहता दूरच्या शहरातील फ्लॅटवर कुटुंबासह राहण्यास जातात. रात्री अपरात्री एखादा पेशंट आजारी पडला तर त्याचे नातेवाईक पेशंटला प्रत्येक दवाखान्यात उपचारासाठी घेवून फिरवतात.शेवटचा प्रयत्न म्हणून सरकारी रुग्णालय गाठतात. पण तेथेही रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याने बहुमूल्य तास दिडतास वाया घालवून पनवेल किंवा उल्हासनगर, ठाणे, मुंबई येथे रुग्णाला घेऊन जातात.यात महत्वाचा वेळ, खर्च झाल्याने परिस्तिथी हाता बाहेर गेलेली असते.

गरोदर स्त्रियांची डिलिव्हरी हा तर फारच गंभीर विषय आहे. गरोदरपणाच्या काळात सरकारी दवाखान्यात सर्व तपासण्या होतात.नॉर्मल डिलिव्हरी होईल असे सांगतात. परंतु प्रत्यक्ष डिलिव्हरी ची वेळ आली की सरकारी दवाखान्यातील कोणीही नर्स किंवा डॉक्टर त्या स्त्रीला दाखल करून घेत नाही. मूल आडवे आहे किंवा इतर काहीतरी कारण सांगून त्यांना यांच्याच प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याचा सल्ला देतात किंवा उल्हासनगरला किंवा अन्य ठिकाणी जायला सांगतात.

असाच प्रकार मंगळवार दि.12 एप्रिल 2022 रोजी तापकिरवाडी येथील आदिवासी महिलेच्या बाबतीत घडला. उषा दत्तात्रय नवले यांना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रसूती वेदना जाणवू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना ग्रामीण रूग्णालय कशेळे येथे नेले. तेथे डॉक्टर उपस्थित नव्हते.काही वेळाने हजर झाले त्यांनी गरोदर महीलेला तपासले असता त्यांनी पुढे कर्जत येथे उपजिल्हा रूग्णालय येथे जाण्यास सांगितले परंतु कशेळे येथे ” रूग्णवाहिका “सुद्धा उपलब्ध नव्हती म्हणून त्या गरोदर महिलेला रिक्षाने कर्जत येथे उपजिल्हा रूग्णालय येथे नेण्यात आले. तेथे दाखल करताना तेथे ही डॉक्टर उपलब्ध नाहीत असे स्टाफ यांनी सांगितले. तेथून पुन्हा रिक्षाने कर्जत येथील ‘ मातोश्री ‘ दवाखाना येथे नेण्यात आले. यामध्ये चार तास धावपळीत गेले तेथे रात्री नऊ वाजता अॕडमिट करण्यात आले. परंतु नोंदणी असून सुद्धा कर्जत उपजिल्हा रूग्णालयात का अडमिट केले नाही असा प्रश्न मातोश्री मध्ये विचारण्यात आला.

या विषया संदर्भात राजिप चे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांना या विषयी माहीती देण्यात आली. त्यांनी तात्काळ मातोश्री येथील डॉक्टर पवार यांना लक्ष देण्यास सांगितले. त्या नंतर सदर महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली. असे असेल तर कशेळे, कडाव किंवा कर्जतच्या डॉक्टरांनी सदर महिलेला का दाखल करून घेतली नाही या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उत्तर द्यावे.

पूर्वीच्या काळी सर्वच महिलांची डिलिव्हरी घरीच सुईणीं करायच्या.कोणतेही प्रशिक्षण नसले तरी आपल्या अनुभवाने अवघडात अवघड डिलिव्हरी सुद्धा त्यांच्या मार्फत होत असे.सरकारी दवाखान्यात प्रशिक्षित नर्स आणि डॉक्टर असून सुद्धा त्यांना अवघड वाटणारे काम जर सुईण करू शकत असेल तर प्रत्येक सरकारी दवाखान्यात किमान दोन सुईणींची नेमणूक शासनाने करावी अशी मागणी उदय पाटील यांनी शासनाकडे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.