Press "Enter" to skip to content

दिव्यांग मुलेसुद्धा करणार रॅम्प वॉक

फॅशन शो च्या रँपवर अवतरणार छोट्यांची किलबिल

सिटी बेल • पनवेल •

पनवेल स्मार्ट मम्मीज अर्थात पी एस एम या पनवेल मधील सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी लहान मुलांसाठी फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या फॅशन शोमध्ये दिव्यांग मुले देखील सहभागी होणार आहेत. शारीरिक कमतरतेवर मात मिळवत त्यांच्या ठायी विजिगीषू वृत्ती जागृत व्हावी या उद्देशाने दिव्यांग मुलांचा रॅम्प वॉक आयोजित करत असल्याचे पी एस एम च्या संस्थापिका शितल ठक्कर यांनी सांगितले.

रविवारी होणाऱ्या फॅशन शो ची पूर्वतयारी म्हणून गुरुवार दिनांक 14 एप्रिल रोजी सराव सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा फॅशन शो पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

आयोजनाबाबत अधिक माहिती देताना कविता ठाकूर यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की, मुलांच्यात आत्मविश्वास वाढीस लागावा हा आमचा आयोजनापाठचा मूळ हेतू आहे परंतु दिव्यांग मुले हीदेखील कुठल्याही क्षेत्रात कमी नसतात हा सामाजिक संदेश देण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असेल.

तर संस्थापिका शितल ठक्कर म्हणाल्या की, कोरोना विषाणूच्या आक्रमणामुळे जवळपास गेली दोन वर्षे मुलांच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीज होत नव्हत्या. शिक्षण, मनोरंजन,शारीरिक अभ्यासक्रम या सगळ्यांसाठी त्यांना ऑनलाईन माध्यमातून सामोरे जावे लागत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी एकत्र यावं आणि फॅशन शोमध्ये सहभागी व्हावं असं आम्हाला वाटलं. आमच्या संस्थेने यापूर्वी महिलांसाठी क्रिकेट लीग, ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पवॉक, पालकांसाठी फॅशन शो, चूल आणि मुल यात अडकलेल्या स्त्रीमधील उपजत गुणांना वाव देण्यासाठी विविध फॅशन शोज चे आयोजन केले आहे. रविवारी होणाऱ्या दिव्यांग मुलांच्या फॅशन शो चा आनंद घेण्यासाठी आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन देखील शितल ठक्कर यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, जे एम म्हात्रे,विक्रांत पाटील,दिलीप पाटील,शुभांगी घरत,डॉ.कल्पना शेट्टे यांची उपस्थिती असणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.