Press "Enter" to skip to content

भाजपाचा शेकापला ४४० व्हाॅल्टचा झटका

जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत करणार भाजपमध्ये प्रवेश : स्वतः च्या भावाचे तिकीट कापून दिलं होतं विवेक पाटील यांनी ज्ञानेश्वर घरत यांना तिकीट‌

सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी •

तालुक्यातील केळवणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत तसेच आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर कानडे व त्यांचे असंख्य सहकारी शुक्रवार दिनांक १५ एप्रिलला सायंकाळी ०७ वाजता भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश करणार असून शेकापक्षाला तालुक्यात आणखी एक मोठा हादरा बसणार आहे.

स्वतः च्या भावाचे तिकीट कापून दिलं होतं विवेक पाटील यांनी ज्ञानेश्वर घरत यांना तिकीट‌” आता शेतकरी कामगार पक्ष मधून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करीत असलेले जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या जागी त्यावेळी माजी आमदार विवेक पाटील यांचे बंधू सुभाष पाटील यांना जिल्हा परिषदेचे तिकीट देण्यात येणार होते. परंतु आयत्यावेळी विवेक पाटील यांनी स्वतःच्या भावाचे तिकीट कापून ज्ञानेश्वर घरत यांना जिल्हा परिषदेला उमेदवारी दिली. त्यावेळी सुभाष पाटील आणि त्यांचे समर्थक त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर कार्यकर्ते भलतेच नाराज देखील झाले होते. परंतु विवेक पाटील यांच्या निर्णयाला मान देऊन अखेर सुभाष पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून ज्ञानेश्वर घरत यांना निवडून आणले. आता मात्र आपल्या जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपताच ज्ञानेश्वर घरत यांनी पक्षांतर करीत असल्याने त्यावेळी नेत्यांचा निर्णय चुकला असे शेकापचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणू लागले आहेत.

आपटा गावातील मैदानावर हा सोहळा होणार असून पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणूनभाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.