बेलापूर येथील ऐतिहासिक श्रीराम मारुती जन्मोत्सव मंडळाचा अनोखा उत्सव
सिटी बेल • बेलापूर •
नवी मुंबईच्या विकासामध्ये सिडको चा निश्चितच सिंहाचा वाटा आहे. परंतु सिडको येण्यापूर्वी देखील येथील स्थानिक रहिवासी साजरे करत असणाऱ्या पारंपारिक उत्सवांची रेलचेल जर पाहायची असेल तर बेलापूर येथील श्री राम मारुती जन्मोत्सव मंडळाच्या उत्सवाला भेट दिलीच पाहिजे.
बेलापूर गावातील तलावा शेजारी असणाऱ्या मंदिरांमध्ये श्री राम मंदिर व श्री हनुमान मंदिर अत्यंत सुबक पद्धतीने बांधण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या राम नवमी व हनुमान जन्मोत्सव सोहळा याची रेलचेल थेट गुढीपाडव्यापासून सुरू होते. चैत्र महिन्यातील पहिल्या दिवसापासून सुरू होणाऱ्या या उत्सवाची ओढ पंचक्रोशीतील गावांना लागून राहिलेली असते. या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे श्री रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सव यानिमित्ताने भरणारी येथील जत्रा !
आमच्या प्रतिनिधीने श्री राम मारुती जन्मोत्सव मंडळ बेलापूर यांच्या वतीने आयोजित या उत्सवाची व त्या योगे भरणाऱ्या येथील जत्रेची खास दखल घेत येथील आयोजकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दिलीप दत्तात्रेय घोसालकर आणि माजी अध्यक्ष विज्ञान म्हात्रे यांनी आमच्या प्रतिनिधीला या मंडळाच्या वतीने करत असलेल्या उपक्रमांचे बाबत अवगत केले.
दिग्गज भजन सम्राटांची रोजची उपस्थिती व ते देत असलेल्या भजनसेवेमुळे येथील वातावरण भक्तिमय झालेले असते. पूजाअर्चा, नैवेद्य, पारंपारिक पद्धतीने म्हटल्या जाणाऱ्या आरत्या, महाप्रसाद या साऱ्यांचा भक्तमंडळी पुरेपुर आस्वाद घेत असतात. यांच्या जोडीला पाळणे, लहानग्यांना मनोरंजनासाठी असणारी अनेक खेळण्यांची रेलचेल, विविधांगी विक्रेत्यांची रंगीबिरंगी उधळण, चोखंदळ खवय्ये यांची क्षुधा शांती करण्यासाठी खाऊचे शेकड्यांनी असणारे स्टॉल्स, मिठाईची दुकाने,कपडे,खेळणी,स्वयंपाकाची भांडी,पडदे,सजावटीचे साहित्य, शृंगाराचे साहित्य, गॉगल्स, टोप्या, पट्टे,कोयते, सुऱ्या, लोखंडी आयुधे, पादत्राणे, पर्स या साऱ्यांचे स्टॉल्स आणि या स्टॉल्सवर उडणारी भक्त मंडळींची झुंबड हा सारा नजारा अत्यंत प्रेक्षणीय असतो.
गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या या उत्सवामध्ये लाखो भक्तमंडळी सहभागी होत असतात. ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबई चे भाग्यविधाते गणेशजी नाईक, बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे, खासदार राजन विचारे, माजी खासदार संजीव नाईक, कोळी महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रमेश दादा पाटील, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी सिडको संचालक नामदेव भगत, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासारख्या दिग्गजांनी यावर्षीच्या सोहळ्यामध्ये आपली सन्माननीय उपस्थिती नोंदविली.
मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दिलीप दत्तात्रय घोसालकर यांनी आमच्या प्रतिनिधीला माहिती देताना सांगितले की येथील उत्सवावर निस्सीम प्रेम करणाऱ्या नवी मुंबईच्या जनतेस हा अत्यंत आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा असा हा उत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्ताने अनेक भाविक नवस बोलत असतात व नवस पूर्ण झालेले भाविक मनोभावे त्यांचे नवस पूर्ण झाल्यावर प्रभू श्रीरामचंद्र आणि मारुतीरायाचे समोर नतमस्तक होण्यासाठी येथे येत असतात. गेले दोन वर्ष या उत्सवावर कोरोना विषाणू मुळे लादल्या गेलेल्या निर्बंधांचे सावट होते. परंतु या वर्षी मात्र सर्व भक्तगण अत्यंत उत्साहाने आणि भक्तीपूर्ण भावनेने या उत्सवामध्ये सहभागी होताना दिसत आहेत.
Be First to Comment