Press "Enter" to skip to content

ग्रामपंचायतीचा कर भरण्याचे आवाहन

वहाळ ग्रामपंचायतीने केले नागरिकांना घरपट्टी भरण्याचे आवाहन अन्यथा… कारवाईचा इशारा

सिटी बेल • वहाळ •

ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा हव्यात तर या नागरिकांनी ग्रामपंचायतीची घरपट्टी देखील वेळेत भरणे गरजेचे आहे असे आवाहन करीत जर नागरिकांनी घरपट्टी भरणा वेळेत केला नाही तर कारवाई करण्याचा देखील इशारा वाहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा समीर पाटील व ग्रामविकास अधिकारी नंदकुमार भगत यांनी दिला आहे.

याबाबत वहाळ ग्रामपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ग्राम पंचायत वहाळ हद्दीतील सर्व खातेदार/ नागरीकांना कळविण्यात येत आहे की, महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम १२४ तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत कर व फी (शुल्क) नियम, १९६० अन्वये ग्राम पंचायतीस गावाच्या सीमेतील इमारती (मग त्या कृषी आकारणी अधिन असोत किंवा नसोत) व जमिनी (ज्या कृषी आकारणीस अधीन नाहीत) यावर ग्राम पंचायतीस कर बसविण्याचा अधिकार आहे. त्याअनुषंगाने वहाळ ग्राम पंचायत हद्दीतील सिडको महामंडळाने विकसित केलेल्या ( उलवे नोड सेक्टर २, ३, ५,१९, १९/बी, २०, २१, २२, २३, २३/ई, २४, २५, २६) वसाहतीतील इमारतींना ग्राम पंचायतीने कर आकारणी करण्याची कार्यवाही पूर्ण केलेली आहे. त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेली घरपट्टीची मागणी बिले वाटपाचे काम सुरू आहे.

घरपट्टीची बिले वाटप करत असताना काही ग्रामस्थ/नागरीक/खातेदार हे घरपट्टीचे मागणी बिल स्विकारण्यास विरोध करून ग्राम पंचायतीने नेमलेल्या कर्मचा-यांसोबत वाद घालून त्यांना दमदाटी करत असल्याची बाब ग्राम पंचायतीच्या निदर्शनास आलेली आहे. घरपट्टी कराबाबत आपले काहीही म्हणणे असल्यास आपण संबंधित कर्मचा-यांशी वाद न घालता आपले म्हणणे ग्राम पंचायत कार्यालयात, कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात कळवावे.

तरी सर्व ग्रामस्थ / नागरीक/खातेदार यांना कळविण्यात येते की, ग्रामपंचायतीने केलेली कर आकारणी ही महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम १२४ तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत कर व फी (शुल्क) नियम, १९६० अन्वये केलेली आहे. त्यामुळे ती सर्व खातेदारांना भरणा करणे क्रमप्राप्त आहे.

तरी सर्व खातेदारांनी घरपट्टी कराची रक्कम ग्राम पंचायत कार्यालयात मुदतीत भरणा न केल्यास ग्राम पंचायत महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम १२९ अन्वये घरपट्टी कराची रक्कम वसूल करेल, याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.