कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरणच्या वतीने नितीन गडकरी यांना निवेदन
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरणच्या वतीने प्रास्तावित उरण रेल्वे स्टेशनच्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी विद्यमान आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष रवी भोईर, नवनीत भोईर,सुरज पाटील,कृष्णा जोशी,हेमदास गोवारी,सुनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या संस्थेच्या वतीने नितीन गडकरी केंद्रीय वाहतूक मंत्री यांना चांदणी चौक, करळ फाटा, उरण येथे निवेदन देण्यात आले.
उरण काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्या असून यामध्ये 2013 च्या केंद्राच्या भू संपादन कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. भविष्यात काळाधोंडा रेल्वे स्टेशन कार्यालयात जी कामगारांची भरती होईल त्यात 100% भरती ही काळाधोंडा रेल्वे प्रकल्पग्रस्तांची करण्यात यावी. रेल्वेची कामे प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावीत. हाऊसकिपींगच्या कामात रेल्वे प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे. रेल्वे स्थानक आवारातील व्यापारी दुकानें /गाळे ही सरकारी फी आकारून मालकी हक्काने किंवा भाडे तत्वावर सरकारी फी आकारून प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे. बाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा. सदर रेल्वे स्टेशनला उरण कोट हे नाव देण्यात यावे या विविध मागण्या संदर्भात अनेकदा संप, उपोषणे, साखळी आंदोलने झाली तरी अजूनही या शेतकऱ्यांना न्याय मिळालेले नाही.
अजूनही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत त्यामुळे आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच यात लक्ष घालावे अशी मागणी आता उरण तालुक्यातील काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. उरण तालुक्यातील कोटनाका-काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पा करिता रेल्वे व सिडको प्रशासन मार्फत संयुक्त रित्या संपादित करण्यात आली त्याबदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणतेही नुकसान भरपाई मिळाले नाही.त्यामुळे आक्रमक झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी 27/11/2020 पासून कोटनाका येथे रेल्वे स्टेशन येथे साखळी उपोषणाला सुरवात केली होती.
अनेकदा संप, आंदोलने झाली मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही.प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आशा असल्याने त्यांनी त्यांची भेट घेऊन सदर निवेदन दिले.








Be First to Comment