Press "Enter" to skip to content

सोलर मोबाईल चार्जिंग स्टेशन

पनवेल बस स्थानक येथे मोफत सोलर मोबाईल चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण

सिटी बेल • पनवेल •

गुढीपाडव्याचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस, नगरसेवक गणेश कडू यांच्या संकल्पनेतून सेक्टर १५ नवीन पनवेल बस स्थानक येथे मोफत सोलर मोबाईल चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते पार पडले.

एक अत्याधुनिक अशी ही संकल्पना ज्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,आरोग्य दूत डॉ.गिरीश गुणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाबाबत माहिती देताना गणेश कडू म्हणाले की, अशा स्वरूपाचे सध्या दोन सेट आम्ही कार्यरत करत आहोत. कामाच्या निमित्ताने पनवेल नगरीमध्ये येणाऱ्या अनेक नागरिकांना याचा लाभ होईल. हल्ली स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. जवळपास एखादा मिनिकॉम्प्युटर म्हणजेच आपला स्मार्टफोन असतो. त्यावर सर्व कामे होत असल्यामुळे त्याची बॅटरी लवकर संपते. विशेषतः ज्यांचे काम फिल्ड वर अधिक असते अशा लोकांकरता हे उपकरण म्हणजे वरदानच ठरेल.

शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू हे नेहमीच अभिनव संकल्पना राबविण्यासाठी ओळखले जातात. क्लॉथ बँक, दुर्गम आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना कॅम्लिन सारख्या कंपनीचे साहित्य मिळवून देणे, विसर्जन घाटावरती खास तराफा बनवून घेणे, वडाळे तलावामध्ये विसर्जनामुळे प्रदुषण होऊ नये यासाठी तलावातच विसर्जन कुंड उभारणे, इंडो रशियन क्रॉस लर्निंग उपक्रमाच्या माध्यमातून थेट जर्मनीच्या विद्यार्थ्यांना इथे पाचारण करणे, गढी नदीपात्र स्वच्छ करणे व ते कायम स्वच्छ ठेवणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक तोफांचे संवर्धन करणे, होतकरू क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे अशा विविध उपक्रमांतून गणेश कडू यांनी अभिनव संकल्पना रुजवल्या आहेत. सोलर चार्जर च्या रूपाने आणखीन एक अभिनव संकल्पना रुजविण्याचा मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात खोवला गेला आहे. हल्लीच्या जमान्यात राजकारणी मंडळी चावून चोथा झालेल्या कार्यक्रमांचा वैयक्तिक प्रसाराकरता अवलंब करत असतात. गणेश कडू हे त्यांच्या अभिनव संकल्पना रुजविण्याचे हातोटी मुळे या सर्व मंडळींच्यात आपले वेगळेपण जपून आहेत.

ऊर्जा संवर्धन हेच ऊर्जा निर्माण करण्याचा स्त्रोत सुद्धा आहे या संकल्पनेतून नैसर्गिक रित्या मिळणाऱ्या ऊर्जेचा अत्यंत कल्पक पद्धतीने वापर करण्याच्या या अभिनव कल्पनेचे समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.