Press "Enter" to skip to content

पनवेलच्या जलयोध्याची सेवानिवृत्ती

पनवेल पाणी पुरवठा विभागातील “जलयोध्याची” सेवानिवृत्ती : सेवानिवृत्तीच्या दिवशी रामदास तायडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सिटी बेल • पनवेल •

पनवेल महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंते रामदास रावबा तायडे ३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. अभियंता म्हणून कार्यरत असणारे रामदास तायडे आणि पाणी पुरवठा विभाग हे एक घट्ट समीकरणच बनून राहिले होते.

१ डिसेंबर १९९५ रोजी रामदास तायडे पनवेल नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात रुजू झाले. त्यावेळी पनवेल नगरपरिषदेची पाणीपुरवठ्याची अवस्था अत्यंत बिकट होती. तायडे यांनी अत्यंत संघर्षपूर्ण परिस्थितीत अप्रतिम नियोजनाचे कौशल्य दाखवत त्या परिस्थितीवर मात केली.

पनवेल नगरपरिषदेत रुजू होण्यापूर्वी पाच वर्षे रामदास तायडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे कार्यरत होते. पाणीपुरवठा व्यवस्था चोख बनविण्याच्या प्रयत्नात असताना पनवेलच्या जनतेने त्यांना सांभाळून घेतले त्यांच्या कार्यकुशलते वरती विश्वास दाखवला, याबद्दल सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात रामदास तायडे यांनी समस्त पनवेलकर यांचे आभार व्यक्त केले.

३१ मार्च रोजी सायंकाळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. उत्स्फूर्तपणे येऊन तायडे यांना शुभेच्छा देणाऱ्या पनवेलकर यांची संख्या पाहून सारेच भारावून गेले होते.

रामदास तायडे यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याला पनवेल महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त पवार, अतिरिक्त अभियंते कटेकर, उप अभियंते सुनील साळुंखे, उप अभियंते राजेश कर्डिले, पाणीपुरवठा विभागासह पनवेल महानगरपालिकेतील कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सुप्रसिद्ध उद्योजक विक्रम डिंगोरकर, संतोष सोनके, दर्शन आगज, श्रीकृष्णदेव साळुंखे, सुरेशशेठ कांडपिळे,सुनील पगडे,प्रशांत चातुर्य यांनीदेखील रामदास तायडे यांना सेवानिवृत्ती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. निवृत्तीनंतर नक्की काय करायचे याबाबत ठरविले नसले तरीदेखील तूर्तास मला माझ्या कुटुंबीयांना खूप सारा वेळ द्यायचा आहे अशी प्रतिक्रिया या सोहळ्यादरम्यान रामदास तायडे यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.