Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

पनवेल तालुक्यातील बेकायदेशीर लेडीज बारचे परवाने रद्द

सिटी बेल • पनवेल • साहिल रेळेकर •

विविध नियमांचा भंग केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील कोन गावाच्या हद्दीतील साईदर्शन व साईराज बारवर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी धडक कारवाई करून या दोन्हीही बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

बार मधील महिला वेटर्स व गिर्‍हाईके यांच्यात अश्लील हातवारे, बीभत्स वर्तन होत असल्याबाबत यापूर्वी पनवेल तालुका पोलिसांकडे अनेक अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. तरीदेखील वारंवार नियमांचा भंग करून बार चालवण्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी धडक कारवाई करून या दोन्ही बारचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत.

याबाबत पनवेल तालुका पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट पाठवले होते. त्या अनुषंगाने हॉटेल साईदर्शन बार येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल येथील दुय्यम निरिक्षकांच्या पथकाने २१ फेब्रुवारी २०२२ रोजी अचानक भेट देऊन परवान्याच्या अनुषंगाने पाहाणी केली.

त्याचप्रमाणे याच परिसरातील हॉटेल साईराज बार येथे देखील पनवेल दुय्यम निरिक्षकांच्या पथकाने १६ फेब्रुवारी २०२२ रोजी अचानक भेट देऊन देऊन परवान्याच्या अनुषंगाने पाहाणी केली असता त्याठिकाणी अनेक अनियमितता आढळून आल्या.

त्याचबरोबर बार मध्ये काम करणाऱ्या कामगार नोंदीच्या अपूर्ण वह्या व पाच महिला विना नोकरनामा येथे काम करताना पथकाला चौकशीदरम्यान आढळून आल्या. बारकरिता मंजूर जागेपेक्षा अधिक जागा वापरण्यात येत असल्याचेही चौकशीदरम्यान निदर्शनास आले होते. तसेच महिला वेटर आणि गिऱ्हाईके यांच्यात असभ्य वर्तन होत असल्याचे वारंवार निदर्शनास आल्याने व अनेकदा वेळेच्या नियमांचा भंग केल्याचेही निदर्शनास आल्याने यापूर्वीही बार वर अनेक अदखलपात्र गुन्हे नवी मुंबई आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ-२ पोलिसांनी दाखल केलेले आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्हीही बारकडून विविध प्रकारच्या नियमांचा भंग झाल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर दोन्हीही बारबाबत सोमवारी (दि.२८ मार्च) सुनावणी पार पडली. अखेर या दोन्हीही बारच्या अनेक नियमभंगतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी धडक कारवाईचा बडगा उगारून हॉटेल साईदर्शन व साईराज या दोन्हीही बारचे परवाने कायमचे रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे पनवेल तालुक्यातील अवैध बार चालकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

पनवेल तालुका परिसरात युवापिढीला बरबाद करणारे लेडीज डान्स बार मोठ्या प्रमाणात आहेत. पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक करुन ऑर्केस्ट्राच्या नावाखाली हे लेडीज डान्सबार चालविले जातात. ऑर्केस्ट्रा फक्त नावाला; बाकी सर्व अश्‍लिलता व आंबटशौकीनता. बीभत्स हावभाव करून नाचणे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याशी अश्लील चाळे करणे अशा प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्या बारचालकांना कायमचा चाप लावण्याची मागणी स्थानिक राहिवाश्यांकडून केली जात आहे.

अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे देखील कठोर कारवाईसाठी पाऊले उचलली जातील.

– कीर्ती शेडगे (अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क- रायगड जिल्हा)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.