Press "Enter" to skip to content

भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

वनवासी कल्याण आश्रम आणि कॅप्री फाऊँडेशनच्या संयुक्त विद्यमाने ७५ जोडप्यांचे एकाच मांडवात शुभमंगल

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

खालापूर तालुक्यातील वाशिवलीवाडी येथे वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र आणि कॅप्री फाऊँडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ जनजाती बांधवांचे भव्य सामुदायिक विवाहसोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील ७५ जनजाती समाजातील जोडपे उपस्थित होते. तर वऱ्हाडी मंडळी ३, ००० च्या संख्येने उपस्थित राहिले.

वनवासी कल्याण आश्रम गेली ७० वर्षे जनजाती बांधवांच्या विविध समस्या ओळखून, आवश्यकता विचारात घेऊन विविध प्रकल्प, उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन जनजाती बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी करत आहे. गेली दोन वर्षे संपूर्ण जग कोव्हीड – १९ शी संघर्ष करून जीवन जगत आहे. त्याचाच परिणाम आमच्या जनजाती बांधवांच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड झाला.

हीच बाब वनवासी कल्याण आश्रम आणि कॅप्री फाऊँडेशन यांनी विचारात घेऊन भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. ७५ जोडपे अर्थात १५० वधू- वरांना, पोशाखापासून ते कन्यादान, वऱ्हाडी मंडळींचं भोजन म्हणजे विवाहसोहळ्याचा संपूर्ण आर्थिक खर्चाचा भार या दोन्ही संस्थांनी उचलला.

या सोहळ्यासाठी कॅप्री फाऊँडेशनचे ट्रस्टी रमेश चंद्र शर्मा,बेबी प्रसाद राऊका, नीता जोशी – कॅप्री फाऊँडेशन – सी. एस. आर , राहुल रसाळ – कॅप्री फाऊँडेशन – सी. एस. आर, वनवासी कल्याण आश्रम, कोकण प्रांत अध्यक्षा ठमाताई पवार, उपाध्यक्ष सोनूबाबा म्हसे, प्रांत संघटनमंत्री अमित साठे, कुलाबा जिल्हा अध्यक्ष अविनाश म्हात्रे सर, सचिव रविंद्र पाटील, कोषाध्यक्ष मोहन मुजुमदार आणि अन्य स्वयंसेवी संस्थेचे अंशु अभिषेक तसेच इतर मान्यवरांची मांदियाळी उपस्थित होती.

तसेच जिल्ह्यातील विविध जनजाती संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते देखील या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कुलाबा जिल्हा सहसचिव सुचेताताई जोशी यांच्या नेतृत्वाखाली रसायनी-खालापूर मधील आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी (टीमने) प्रचंड मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.