Press "Enter" to skip to content

उल्हास नदी पूरनियंत्रण आणि स्वच्छता परिषदेचे आयोजन

उल्हास नदी संवर्धन व सुशोभीकरणासाठी 46 कोटी रुपयांचा निधी मंजूर — आमदार महेंद्र थोरवे

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

‘कर्जत तालुक्याच्या सर्व भागात विकासाची कामे सुरू असताना नदी संवर्धन महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना ही योजना शहराच्या विकासासाठी महत्वाची आहे हे पटवून दिले आणि कर्जत उल्हास नदी संवर्धन कामासाठी 46 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी दोन किलोमीटर साठी असून अतिरिक्त तीन किलोमीटरच्या संवर्धनासाठी आणखी निधी लागणार आहे हे लक्षात घेऊन या प्रकल्पासाठी लागणारी अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. त्यामुळे आपल्या उल्हास नदीचे संवर्धन व सुशोभीकरण चांगल्या प्रकारे होईल.’ असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला.

उल्हास नदी निर्मल जल अभियानच्या वतीने उल्हास नदी पूरनियंत्रण आणि स्वच्छता परिषदेचे आयोजन हानी मंदिर देवस्थानच्या रविकिरण सभागृहात करण्यात आले होते. हिरवळ प्रतिष्ठान चे किशोर धारिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पुंडलिक पाटील, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता राकेश धाकतोडे आदी उपस्थित होते.

मुकुंद भागवत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. समीर सोहनी यांनी प्रास्ताविकात परिषदेचा उद्देश सांगितला. डॉ. नितीन आरेकर यांनी,’ आपण शासन किंवा प्रशासनावर ताशेरे ओढायला आलो नसून आपली नदी वाचविण्यासाठी जमलो आहोत.’ असे सुरुवातीलाच स्पष्ट केले. त्यानंतर सुरेश खानविलकर, नगरसेवक राहुल डाळिंबकर यांनी, ‘यापूर्वी माजी आमदार सुरेश लाड यांनी नदी स्वच्छता करण्याचा चांगला प्रयत्न केला. त्याचे फलित सुद्धा आपण अनुभवले आहे. आता सर्वांनी मिळून नदी संवर्धनाचे काम केले पाहिजे.’ असे सूचित केले. प्रवीण गांगल यांनी ‘या परिषदेला मुख्याधिकारी उपस्थित रहायला पाहिजे होते म्हणजे त्यांना कर्जतकरांच्या व्यथा समजल्या असत्या’ असे सांगितले.

सहभागी होण्यासाठी आजचं काॅल करा

नंदन भडसावळे यांनी, ‘ मी बावीस पुरांचा साक्षीदार आहे. त्यामुळे यापुढे असा प्रसंग होऊ नये म्हणून बंदोबस्त करणे गरजेचे आहे.’ अशी अपेक्षा व्यक्त केली. शशांक शेट्टी यांनीही व्यथा मांडली. यावेळी 40 प्लस टीम स्पर्धांच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न अभियानाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

पुंडलिक पाटील यांनी, आपणच नदीत कचरा टाकतो आणि तीच नदी आपण स्वच्छ करावी म्हणून परिषद घेतो ही शरमेची गोष्ट आहे. सगळं शासनानेच करावे अशी आपली अपेक्षा असते. शासन म्हणजे आपणच आहोत हे जरी आपण लक्षात ठेवले तरी सारे काही ठीक होईल. खरे तर खेडोपाडी गल्ली गल्लीत पेव्हर ब्लॉक, काँक्रीटीकरण होत असल्याने पाहिजे तितके पाणी जमिनीत मुरत नाही.’ असे सांगितले.

राकेश धाकतोडे यांनी उपस्थितांना जला विषयीची प्रतिज्ञा दिली. उल्हास नदीची लांबी 145 किलो मीटर आहे तर पाणलोट क्षेत्र 4538 आहे.’ अशी माहिती दिली.

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी यावेळी बोलताना शहरात स्वच्छता नांदावी यासाठी भुयारी गटार व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करणे गरजेचे आहे. हा प्रकल्प राज्य सरकारच्या विचाराधीन असलेला हा प्रकल्प लवकरच मंजूर होईल. नदी संवर्धन चे दोन टप्पे मंजूर झाले आहेत. ते लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.’ अशी अपेक्षा व्यक्त केली.

जलनायक किशोर धारिया यांनी, ‘वाहत्या पाण्याचे साक्षीदार असलेलो आपण सर्व उल्हासनदी प्रदूषित झाली म्हणून ओरड करतो. त्या उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली उपाययोजना राबविली जाणार आहे. त्यासाठी कर्जत येथील तरुण वर्गाने हाती घेतलेले काम यशस्वी होईल. कर्जत तालुक्यातील जलसैनिक सहभागी करून घेण्यासाठी स्वच्छता अभियान अग्रभागी असल्याने नदी सर्वधनासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतील. असे जाहीर केले. सूत्रसंचालन डॉ. नितीन आरेकर तर आभार प्रदर्शन विकास चित्ते यांनी केले.

याप्रसंगी राजेश लाड, भारती पालकर, पुष्पा दगडे, संचिता पाटील, मधुरा चंदन, संतोष पाटील, सोमनाथ पालकर, रणजीत जैन, ऍड. कैलास मोरे, प्रभाकर गंगावणे, रंजन दातार, राजाभाऊ कोठारी, मीना प्रभावळकर आदींसह कर्जतकर मोठया संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.