Press "Enter" to skip to content

२४ जूनला ११ जिल्ह्यातील एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार

होळीच्या दिवशी सिडकोच्या नावाने शिमगा ; रखरखत्या उन्हातही ठाम राहून सिडकोला इशारा

सिटी बेल • पनवेल • हरेश साठे •

येत्या २४ जूनला एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार आहेत, त्यामुळे सिडको आणि राज्य सरकारच्या विरोधात काही तरी भयंकर घडणार आहे, अशी भविष्यवाणी करत ‘भूतो न भविष्यतो’ आंदोलनाचा गर्भित इशारा काळा दिन आंदोलनातून सिडको आणि राज्य सरकारला देण्यात आला, आणि तशी घोषणा लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी यावेळी केली. तसेच यावेळी रखरखत्या उन्हात सिडकोच्या नावाने शिमगा करण्यात आला. येत्या काळात सिडको आणि राज्य सरकारच्या उरात धडकी भरवणारे निर्णय घेण्यात येतील असे या आंदोलनातून अधोरेखित करण्यात आले.

लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार महेश बालदी, सरचिटणीस कॉम्रेड भूषण पाटील, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, अतुल पाटील, २७ गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, खजिनदार जे. डी. तांडेल, दशरथ भगत, राजेश गायकर, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, कामगार नेते सुरेश पाटील, अरुण जगे, महापालिका स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेविका हेमलता म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, अमर पाटील, प्रवीण पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, गव्हाण उपसरपंच विजय घरत, वहाळ उपसरपंच अमर म्हात्रे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कमगारनेते सुधीर घरत, सुनील घरत, यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सामील झाले होते.

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जासई जन्मगावी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून १७ मार्च या सिडकोच्या वर्धापन दिनी पनवेल, उरण व बेलापूर पट्ट्यातील ९५ गावातील सिडको पीडित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती व इतर प्रकल्प समितीच्यावतीने दास्तान फाटा येथे काळा दिन आणि रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी या क्रांतिभूमीतून दिबांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच २४ जूनचा एल्गार जाहीर करतानाच आजपासून त्याची तयारी आणि नियोजन सुरु असल्याचे अधोरेखित केले.

१८ एप्रिल २०२१ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा बाबत सिडको संचालक मंडळाने केलेला ठराव विखंडित करून लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ठराव मंजूर करण्यात यावा, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना विनविलंब १२.५% भूखंड वाटप करण्यात यावे, दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी गरजेपोटी बांधकामांच्या बाबतीत प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयाबाबत प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन योग्य ते बदल करण्यात यावेत तसेच नवीमुंबई प्रकल्पग्रस्तांच्या सर्व प्रलंबित मागण्या बैठका घेऊन सोडविण्यात याव्यात, या मागण्यांसाठी गुरुवारी जोरदार रास्ता रोको करण्यात आला.

आंदोलन तीव्र होऊ नये यासाठी पोलिसांनी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार महेश बालदी, कॉम्रेड भूषण पाटील, २७ गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, दशरथ भगत तसेच महिला आंदोलकांना ताब्यात घेतले व त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

२४ जूनला किमान ११ जिल्ह्यात आंदोलन होईल- दशरथदादा पाटील
आंतराष्ट्रीय विमानतळ झाले पाहिजे याबद्दल दुमत नाही पण त्या विमानतळाला दिबांचे नाव लागलेच पाहिजे हे अंतिम सत्य आहे. अन्यथा फार मोठी क्रांती घडेल आणि त्याशिवाय पर्याय राहणार नाही. या भागातील तसेच नवी मुंबईतील काही भागातील प्रकल्पग्रस्तांना प्लॉट दिले गेले नाहीत. नगरविकास खात्याकडून काही प्लॉट विकले गेले आहे असे समजते आणि त्याचाही अभ्यास सुरु आहे. ४० वर्षे होऊन सिडको प्रश्न मार्गी लावत नाही त्यामुळे सातत्याने आपल्याला आंदोलने करावे लागतात. दिबा पाटील आमच्या जीवनातील आदर्श आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आंदोलनाची यशस्वी वाटचाल होत असून हा लढा सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही. येत्या २४ जूनला किमान ०१ लाख लोकांचा जनसमुदाय रस्त्यावर उतरणार असून त्याच्या तयारीला सुरुवात झाली अशी. सर्वनिशी तयारी करून आता उतरायचे आहे. पालघर मधील मंडळी १५ ते २० हजार लोकांचा ताफा घेऊन गुजरात महामार्ग, भिवंडीवाले २० हजार लोकं नाशिक महामार्ग, ठाणे, कल्याण, डोंबिवलीवाले त्यांच्या भागातील रस्ते त्याचबरोबर रायगड नवी मुंबई वाले पुणे तसेच गोवा महामार्ग बंद करण्याचा मानस करून आहेत. तशी चर्चा झाली आहे पण अंतिम नियोजन येत्या कालावधीत होईल. केवळ आश्वासन नको एक महिन्याच्या आत जेएनपीटी साडेबारा टक्के कार्यवाही सुरु झाली पाहिजे अन्यथा पुन्हा या मागणीसाठी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जो पर्यंत सर्व मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या पदरात पडत नाही तो पर्यंत लढा सुरूच राहणार आहे, २४ जूनला किमान ११ जिल्ह्यात आंदोलन होईल आणि त्या तयारीला वेग येईल.

स्थानिकांचा विचार करीत नसतील तर सिडको समुद्रात बुडवायला लागेल- लोकनेते रामशेठ ठाकूर दि बा पाटील साहेबांचे नाव विमानतळाला मिळालेच पाहिजे हे आपले धेय्य ठरलेले आहे. आणि सिडको प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत जो अन्याय करतोय तो दूर करण्यासाठी आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारलेला आहे. संघर्ष करून लोकांना त्रास देण्याचा आमचा धंदा नाही आणि ते काम आम्ही करणार नाही फक्त प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत याच आमच्या रास्त अपेक्षा आहेत. सिडको जर चांगले नियोजन करत असेल तर ठीक आहे पण हे करताना स्थानिकांचा विचार करीत नसतील तर सिडको काहीही उपयोगाची नाही ती सिडको समुद्रात बुडवायला लागेल आणि एक दिवस तो हि येईल. पण सिडकोला पण आता समजतंय आपण यांना त्रास दिला तर हि लोक आपल्याला इथे ठेवणार नाहीत. आणि तशा दृष्टीने ते चर्चेला येतात. मागच्या आंदोलनामुळे एक एक यश प्रकल्पग्रस्तांच्या पदरात पडत आहे. दिबा पाटील साहेबांच्या नावाचा प्रस्ताव अद्याप मंजूर केला नसला तरी पूर्वीचा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आग्रह न धरता तो दाबून ठेवला आहे म्हणून ५० टक्के आपला विजय झाला आहे. विमानतळ २७ गावांचे प्रश्न आहेत, उरण तालुक्यातील जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न सोडविण्याकरिता आपला आग्रह कायम राहिला आहे.

प्रकल्पग्रस्तांची जिद्द मोठी आहे आणि या ठिकाणीच १६ जानेवारी १९८४ ला ती दिसली. सर्व बाजूकडून पोलिसांची फौज चाल करत आली आणि आम्ही मध्यभागी आम्ही होतो. मी स्वतः त्यामध्ये हजर होतो. पोलिसांनी गर्जना केली ‘पळा जाता कि नाही एक मिनिटात!’, आम्ही पण उत्तर दिले नाही आम्ही येथून हलणार नाही जो प्रश्न सुटत नाही तो पर्यंत, त्यानंतर पोलिसांकडून अश्रूधूर त्यांनतर गोळीबार झाला आणि या ठिकाणीच दोन हुतात्मे झाले. हीच ती भूमी आहे. सिडकोने आपले हुतात्मे केले. आपल्या लोकांना देवाघरी पाठवले. पण त्यांच्या कुटुंबाची बिकट अवस्था झाली. ३१ ते ३२ जणांना गोळ्या लागल्या. शेकडो लोकांवर लाठीमार झाला. आमच्या हातात काहीच शस्त्र नव्हते. शेवटी ध्येय्याने जो वेडा होतो. त्यावेळी तो कशाची तमा बाळगत नाही तशा प्रकारे समित्या काम करीत आहेत. समितीत कोण येतोय नाही येत याचा विचार आम्ही करीत नाही पण दिबांच्या नावाला विरोध करू नका एवढेच आमचे त्यांना सांगणे आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत काही कमतरता असेल तर अवश्य सुचवा, आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत आपापसात भांडण करून चालणार नाही. काही लोकांना करायचे असेल तर त्याला इलाज नाही.

१९८४ सालापासून साडेबारा टक्के भूखंडचा विषय झाला आणि त्याच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या. लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या हस्ते नारळ वाढवून भूखंड विकसित करण्याच्या कामाला सुरुवात झाली. पण अजून सुद्धा प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळत नसतील तर कसे होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरकार अडाणी आहे. शिकलेली लोक असतील त्यामध्ये भरपूर पण विचारांच्या बाबतीत अडाणी आहेत उगाच आडी मारायची अशा प्रकारची कामे करतात, म्हणून आठ आठ महिने वर्क ऑर्डर देत नव्हते. सिडको सरकारशी बोला जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड प्रश्न मार्गी लावा तरच हे १७ मार्चचे आंदोलन उग्र होणार नाही असे आमच्याशी चर्चा करायला आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगितले आणि तसे त्यांनी सिडकोला शासनाला कळविले असेल त्यामुळे सिडकोने आता ऑर्डर दिली आणि हा प्रश्न मार्गस्थ लागला आणि ते दिबासाहेबांच्या आशीर्वादामुळे आणि आंदोलनामुळेच शक्य झाले आहे. काल पी. पी. खारपाटील यांना वर्क ऑर्डर घेण्यासाठी त्यांनी बोलावले तीनचे साडेपाच वाजले मग त्यांनी सांगितले नसेल द्यायची ऑर्डर तर सांगा आम्ही चाललो त्यावेळी त्यांचा अभियंता मुंबईला होता आता येतो नंतर येतो चालले होते त्यावेळी पुन्हा टोलवाटोलवी पाहता खारपाटील यांनी आम्ही चाललो असे नसेल द्यायचे तर सांगा असा पुनरुच्चार केला, त्यांना माहिती होते आपण ऑर्डर नाही दिली तर १७ मार्चचे आंदोलन उग्र होईल हे लक्षात घेऊन त्यावेळी संबंधित दुसऱ्या अधिकाऱ्याने वर्क ऑर्डरवर सही केली. सिडकोला आपली नोंद घ्यावी लागत आहे. हा आपल्या प्रकल्पग्रस्तांचा मोठा विजय आहे. यापुढील काळातही विजय परंपरा कायम ठेवायची आहे आणि लढाई जिंकू या. महिला आंदोलक रणरागिणी सारख्या तळपळत्या उन्हात ठामपणे होत्या त्यांचा आवाज बुलंद होता. त्यांचे कौतुक करू तेवढे कमी आहे.

सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा कायम राहणार – आमदार प्रशांत ठाकूर

१७ मार्च सिडकोचा स्थापना दिवस. सिडकोच्या दृष्टिकोनातून कदाचित तो अभिमानास्पद दिवस असेल पण या दिवशी प्रकल्पग्रस्तांना संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय समितीने निर्णय घेतला कि, लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव विमानतळाला मिळाले पाहिजे आणि प्रकल्पग्रस्तांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत. ते सोडविण्याच्या दृष्टिकोनातून क्रांतिभूमी दास्तान फाटा येथे रास्ता रोको करायचे आणि अनुषंगाने आज आंदोलन पुकारले असून जो पर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत कितीही काळ लागो लढा यशस्वी थांबायचे नाही.

प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा विजय – आमदार महेश बालदी

आज होळी असतानाही मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दिबा पाटील साहेबांचे नाव विमानतळाला देण्यासाठी आग्रही आहोत हे दाखवून दिले, त्यासाठी मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. गेल्या १० जूनपासून आपण दिबा पाटील साहेबांच्या नावाचा आग्रह धरत राज्य सरकारला आहे तेथे थोपवण्यात यश मिळविले आहे. त्यासाठी व्यासपीठ आणि प्रकल्पग्रस्तांचे आभार मानतो. १० जूनला आपण मानवी साखळी आंदोलन केले, २४ जूनला सिडको भवनाला घेराव आंदोलन केले, त्यानंतर ०९ ऑगस्टला मशाल मोर्चा, १३ जानेवारीला निर्धार परिषद घेतली, २४ जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन केले त्यामुळे या सर्वाचा परिपाक झाला कि राज्य शासनाने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव सिडकोकडून करून घेतलेला तो राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये मंजूर केला नाही किंबहुना आणला नाही हे समिती आणि प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या आजपर्यंतच्या लढ्याचे फळ आहे. राज्य सरकार संधीची वाट बघतेय पण ती संधी आंदोलनाच्या रेट्यापुढे मिळालेली नाही हे या लढ्याचे यश आहे. सिडकोकडे अनेक प्रलंबित कामे प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित आहेत. हे प्रश्न सुटले पाहिजेत न्याय मिळाला पाहिजे यासाठी सिडकोचा वर्धापनदिन काळा दिन आणि रास्ता रोको निर्धार केला. सिडकोकडे प्रलंबित जेएनपीटी च्या साडेबारा टक्के भूखंडाचे टेंडर गेल्या २३ ऑगस्ट ला जाहीर केले होते. आठ महिने त्यांनी वर्क ऑर्डर थांबवलेली नाकर्ते सरकारच्या नाकावर टिचून या आंदोलनाचा रेटा आणि धसका घेऊन सिडकोने ती वर्क ऑर्डर ठेकेदाराला दिली. आम्हाला ठेकेदारांचा कौतुक नाही पण साडेबारा टक्केच्या ५० वर्षांपासून प्रलंबित सिडकोचे नसलेले पण जेएनपीटीने देऊ केलेले साडे बारा टक्क्याचे प्लॉट मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला. आणि त्याचे डेव्हलपमेंट सुरु होईल तो आजच्या आंदोलनाच्या आनंदाचा भाग आहे. परवा झालेल्या सिडकोच्या एमडी सोबत बैठकीत सर्व कमिटीकडे २७ गावचे प्रश्न, विमानतळ बाधितांचे प्रश्न असतील मग त्यामध्ये सीसी, ओसी चा प्रश्न असेल, त्यानंतर १८ महिन्यानंतरच्या घरभाड्याचा प्रश्न, आर आर पॉकेट मध्ये राहिलेली डेव्हलोपमेंट असेल या सर्व कामांची कमिटमेंट सिडको एमडींकडून समितीने घेतली हा आनंदाचा क्षण आहे कि अशा आंदोलनापुढेच सिडको झुकली आणि त्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्या. नंदराजजी काळजी करू नका १८ महिन्यानंतरच्या देण्याचे भाडे हेही मिळवून घेऊ. वीस्थापनानंतर एअरपोर्ट ऑथॉरिटीमुले ओसी सीसी मिळण्यास उशीर होत असेल तर त्याच्या करिता उर्वरित महिन्यांचे भाडे सिडकोनेच द्यायला पाहिजे. हे सुद्धा आपल्या आंदोलनाचा भाग आहे. कालच लोकनेते गणेश नाईक यांनी २५० मिटरचे गावठाण विस्तार सरकारने केले ते कसे चूक आहे आणि त्याच्याकरिता काय काय बरोबर केले पाहिजे हे विस्तृत विधानसभेत मांडले. त्याकरिता मी गणेश नाईक यांचे अभिनंदन करतो. अनेक ठिकाणच्या भौगोलिक परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. एका बाजूला २५० मीटर ची असतील, कुठल्या परिघामध्ये असतील, नाला असेल नदी असेल, खाडी असेल तर त्याची २५० मीटर ची उपयोगाची नाही त्यामुळे दुसरीकडची ५०० मीटरची करायला पाहिजे या सर्व गोष्टींची विस्तृत चर्चा समितीने परवा सिडको केलेली आहे. होळीचा सण असतानाही आजचा रास्ता रोको तळतळत्या उन्हात होत आहे. तुमचा आणि आमचा एकच धेय्य आहे दिबासाहेबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे आणि प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. त्यासाठी प्रकल्पग्रस्त आणि लोकप्रतिनिधी आपण एक राहिलो तर सिडकोच्या बापालाही हि सर्व कामे करायला भाग पाडू, हि एकजूट आपण कायम ठेवत यापुढेही जेव्हा जेव्हा आंदोलनाची हाक येईल तेव्हा तेव्हा प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

आपला लढा चालू आहे. ज्या जमिनीवर विमानतळ उभा राहत आहे त्या विमानतळाला आमच्या बापाचे नाव म्हणजेच दिबा पाटील साहेबांचे नाव दिलेच पाहिजे. कितीही दिवस लढा चालू राहू दे सर्व मागण्या मान्य होईपर्यँत आंदोलन सुरुच राहणार आहे. आणि ती प्रतिज्ञा आपण सर्वानी घेतली आहे. आज आपण या आंदोलनांची हाक दिली म्हणून परवा समिती बरोबर एमडीनी बैठक घेतली. बैठकीत त्यांनी नामकरणाचा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे असे सांगितले. त्यामुळे आमचे महाराष्ट्र सरकारला आव्हान आहे, बऱ्या बोलाने लोकांच्या भावना लक्षात घ्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव विखंडित करावा आणि दि. बा. पाटील साहेबांच्या नावाचा ठराव सिडकोने करावा अशी आम्ही मागणी करीत आहोत. आणि त्यासाठी आम्ही शेवट पर्यंत लढत राहू. कारण तो आमच्या अभिमानाचा आहे, भावी पिढीच्या भविष्यासाठी हा लढा आहे म्हणून तो लढला जात आहे. – कॉम्रेड भूषण पाटील

आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. रखरखत्या उन्हात सिडकोच्या नावाने शिमगा करण्यात आला. अमर रहे अमर रहे दिबा पाटील साहेब अमर रहे, विमानतळाला दिबासाहेबांचे नाव मिळालेच पाहिजे, सिडको हाय हाय, प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो, ताई माई अक्का एमडी ला मारा धक्का, सिडको हटाव भूमिपुत्र बचाव, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.