सिटी बेल • अलीबाग • धम्मशील सावंत •
रायगड़ जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजासमोर आदर्श ठेवणा-या व्यक्तींचा रायगड जिल्हा परिषदेतर्फे रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. नुकतेच रमेश प्रभाकर धनावडे यांना यावर्षीचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात आला आहे.
पीएनपी थिएटरमध्ये पार पडलेल्या शानदार समारंभामध्ये रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते रमेश प्रभाकर धनावडे यांना हा रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या समारंभासाठी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, आमदार बाळाराम पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, ऍड.आस्वाद पाटील, चित्रा पाटील, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रमेश प्रभाकर धनावडे यांनी साहित्य क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. संपूर्ण जिल्ह्यामधे त्यांनी एक उत्कृष्ट साहित्यिक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. एक लेखक म्हणून व कवी म्हणून ते सगळ्यांना सुपरिचित आहेत. त्यांनी एम.कॉम, एल. एल.बी., एम.बी.ए. पर्यंत शिक्षण पुर्ण केले असून ते सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे येथे वरिष्ठ व्यवस्थापक – एच.आर. (जनसंपर्क अधिकारी) म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ‘मनतरंग ‘ काव्यसंग्रह, ‘ऊर्मी’ चारोळी संग्रह तसेच ‘जीवनगाणे’ ललितसंग्रह प्रकाशित आहेत.

कवितेच्या सुरांतून हे त्यांचं महत्वाचं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. यामध्ये त्यांनी संत काव्यापासून आत्ताच्या कवींपर्यंत महाराष्ट्रातील मुख्य कवींचा जीवनपट रेखाटला आहे.
त्यांचा ‘जीवनगाणे ‘ स्तंभ (कॉलम) कृषीवल मध्ये सलग तीन वर्षे प्रसिद्ध होत होता.
‘गुदगुल्या ‘ या राजकीय व सामाजिक वात्रातिका दै.पुढारी मध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. कवितेच्या सूरातून’ हा महाराष्ट्रातील प्रख्यात कवींवरील स्तंभ दै.पुढारीमध्ये प्रसिद्ध होउन त्याला खूप चांगली लोकप्रियता मिळाली होती. रायगड टाईम्स मधिल ‘बी पॉझिटिव्ह’ या त्यांच्या डिजिटल मुलाखती खूपच गाजल्या. अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा, लेख, कविता आणि चारोळ्या प्रसिद्ध होत असतात.
अलिबाग लायन्स क्लबमध्ये ते प्रेसिडेंट म्हणून कार्यरत होते. ‘गीतरामायण’ व इतर अनेक कार्यक्रमांसाठी त्यांनी सूत्रसंचलन केले आहे. ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’ या चित्रपटासाठी गीतकार म्हणून त्यांनी पदार्पण केले असून आर्या आंबेकर या गुणी गायिकेने ते गाणे गायलं आहे. ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग होता. अनेक काव्यसंमेलानात ते कवी म्हणून आमंत्रित असतात व त्याचप्रमाणे अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये ते प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शनही करत असतात. ते सध्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा मराठी भाषा समितीचेही ते जिल्हा प्रतिनिधी आहेत.
त्यांना आजवर मिळालेल्या पुरस्कारमधे ‘कृषीवल कौतुक पुरस्कार’, ‘दैनिक पुढारी सन्मान पुरस्कार’, ‘रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ पुरस्कार’, ‘म.ना. पाटील साहित्य पुरस्कार ‘, ‘नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार पुरस्कार’, ‘सुभानराव राणे प्रतिष्ठान पुरस्कार’ ‘साहित्य संपदा संस्थेचा साहित्यरत्न पुरस्कार’, ‘तेजस्विनी फाऊंडेशनचा कोव्हिड योद्धा पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारंनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
अनेक शासकीय कार्यक्रमांमध्ये त्यांनी सूत्रसंचालन केले आहे. यात प्रामुख्याने जिल्हा ग्रंथोत्सव व माननीय राज्यपाल, महाराष्ट्र शासन यांच्या झालेल्या भरडावाडी येथील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन याचा समावेश होतो. त्यांना मिळालेल्या रायगड भूषण पुरस्कारासाठी त्यांच्यावर संपूर्ण जिह्यातून अनेक मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment