Press "Enter" to skip to content

अल्पसंख्यांक समाजातील महिलांकरता हळदीकुंकू

पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा

सिटी बेल • पनवेल •

जगभरात 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.ठीक ठिकाणी कर्तुत्ववान महिलांचे, नैपुण्य प्राप्त महिलांचे, वेगळ्या वाटा आत्मसात करणाऱ्या महिलांचे, विजीगिषु वृत्तीने संघर्ष करणाऱ्या महिलांचे सन्मान-सत्कार होत असतात. परंतु पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला आघाडीने अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला.

निधर्मवादी भूमिकेतून आणि मानवतावादी दृष्टिकोन ठेवून सुदृढ समाज निर्मिती करण्यावर नेहमीच काँग्रेस पक्षाने भर दिला आहे. तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी यांनी दिलेल्या “लडकी हुं लढ सकती हुं” या संकल्पनेचा आधार घेत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा निर्मलाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. सर्व धर्मियांना आपलेसे करण्याच्या भूमिकेतून अल्पसंख्यांक समाजातील महिलांकरता हळदीकुंकू चे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांना गुलाबपुष्प आणि अत्तर प्रदान करून हळदी कुंकवाचे वाण देण्यात आले.

यासोबतच वाल्मिकी समाजाच्या महिलांना त्या करत असलेल्या स्वच्छतेच्या कार्यामुळे साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना देखील हळदी कुंकवाचे वाण प्रदान करण्यात आले. विशेष उल्लेखनीय म्हणजे अत्यंत अल्प अशा प्रीमियम मध्ये एक वर्षा करता अपघात आणि आरोग्य विमा महिलांना देण्याकरता काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. गरीब व गरजू महिलांना काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रीमियम भरून सदर विमा पॉलिसी विनामूल्य मिळवून दिल्या. यासोबतच महिलांच्या अंगातील विविध कलागुणांना वाव मिळण्याच्या उद्देशाने मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

सर्व धर्मीय आणि सर्व जातीय महिलांनी या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. अत्यंत सजग आणि नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थितांनी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा निर्मलाताई म्हात्रे यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.