धक्कादायक… भारतामध्ये दर चार मिनिटाला होत आहे एका महिलेला गर्भाशयाचा कर्करोग !
सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुलुंड येथील अपेक्स हॉस्पिटलतर्फे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मोफत पॅप स्मियर व इतर वैद्यकीय चाचणी शिबीर आयोजित केले आहे.
मुलुंड, कांजूरमार्ग , भांडुप व विक्रोळी इथे काम करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची पुढील २ दिवस मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून या शिबिराची सुरुवात पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांच्या उपस्थितीत झाली. या शिबिरात शंभरहून अधिक महिला पोलीस सहभाग घेतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या शिबिराची माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाच्या ऑपेरेशन मॅनेजर डॉ. तन्वी शहा म्हणाल्या , गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर हे भारतातील महिलांमध्ये कर्करोगाच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या जागतिक मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू भारतात होतात. याचे मुख्य कारण म्हणजे नियमित शारीरिक तपासणीचा अभाव तसेच वेळेवर वैद्यकीय उपचारांचा अभाव आहे.

आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही कार्यतत्पर महिला पोलिसांची पॅप स्मियर चाचणी व इतर वैद्यकीय तपासण्या करणार आहोत. पोलिसांचे वेळापत्रक हे नेहमीच व्यस्त असते त्यामुळे अनेकांना शारीरिक तपासणीसाठी वेळ मिळत नाही हीच बाब लक्षात घेऊन आम्ही हे शिबीर आयोजित केले आहे. मुंबईकरांसाठी मुंबई पोलिसांचे योगदान नक्कीच कौतुकास्पद असून आज जागतिक महिला दिनानिमित्त अपेक्स हॉस्पिटल समूहातर्फे आम्ही हे शिबीर सामाजिक बांधिलकीतून आयोजित केले आहे.”
भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
विषाणूंचा संसर्ग (एचपीव्ही) हे प्रमुख कारण गर्भाशयाच्या कर्करोगाच्या वाढलेल्या प्रमाणासाठी कारणीभूत आहेत.सुयोग्य स्वच्छतागृहांची कमतरता, स्वच्छतेच्या अपुऱ्या सुविधा हे घटकही यासाठी कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे बैठी जीवनशैली, अयोग्य आहार, स्थूलपणा, मानसिक ताणतणाव यामुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
गर्भाशयाच्या कर्करोगाची भारतात वर्षाला एक लाख वीस हजार नवीन प्रकरणे आढळतात याचाच अर्थ अंदाजे दर ४ मिनिटांनी एका महिलेमध्ये गर्भाशयाचा कर्करोग आढळतो, सुदैवाने गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग लसींद्वारे टाळता येऊ शकतो आणि नियमित पॅप स्मीअर चाचणी करून पहिल्या टप्प्यामध्ये निदान केले जाऊ शकते. लवकर निदान झाले तर कर्करोगापासून मुक्ती मिळू शकते अशी माहिती डॉ. तन्वी शहा यांनी दिली.








Be First to Comment