Press "Enter" to skip to content

शिवुर्जा प्रतिष्ठानतर्फे १० जलदुर्गांवर भटकंतीचे आयोजन

४० दिव्यांगांची रायगड जिल्ह्यातील सागरी जलदुर्गावर भटकंती

सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •

शिवुर्जा प्रतिष्ठान या गड किल्ले भ्रमण व संवर्धन करणाऱ्या संस्थेतर्फे समुद्रातील दहा जलदुर्ग किल्ल्यावर भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते.

शिवुर्जा प्रतिष्ठान ही संस्था गेल्या पंधरा वर्षापासून राज्यातील विविध प्रकारच्या दिव्यांगांना सोबत घेऊन गड किल्ल्यावर भटकंती मोहिमांचे आयोजन करणारी संस्था आहे.
प्रतिष्ठान तर्फे गेल्या पंधरा वर्षात 48 पेक्षा जास्त गड किल्ले भटकंती मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवुर्जा प्रतिष्ठान या गड किल्ले भ्रमण व संवर्धन अंतर्गत समुद्रातील खांदेरी, उंदेरी,रेवदंडा, खूबलढा, बिरवाडी, कोरलई, पद्मदुर्ग कासा, जंजिरा व कुलाबा या दहा सागरी जल दुर्गावर भटकंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील तब्बल 40 दिव्यांगांनी या आठ सागरी दुर्ग मोहिमेत सहभाग नोंदवला.
संस्थेचे सचिव कचरू चांभारे यांच्याकडे या संपूर्ण मोहिमेचे चे आयोजन देण्यात आले होते.
संपूर्ण राज्यभरातील दिव्यांग अलिबागच्या थळ बंदरात 25 फेब्रुवारी 2022रोजी एकत्र येऊन प्रथम सभा घेण्यात आली.त्यानंतर तीन दिवसीय गड मोहीम आखाण्यात आली.
या सागरी जलदुर्ग मोहिमेसाठी औरंगाबाद, नाशिक, नगर, पुणे, मुंबई, ठाणे, बीड, सांगली, बुलढाणा, सोलापूर, वर्धा या जिल्ह्यातून सर्व प्रकारचे दिव्यांग सहभागी झालेले दिसून आले.

या सागरी दुर्ग भटकंती मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे चाळीस पैकी 11 महिलांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रपती पदक विजेत्या नेहा पावसकर या अंध महिलेने तर 30 वेळा कळसुबाई शिखर सर करून जागतिक विक्रम करणारा सागर बोडके व सायकलने सात हजार पाचशे किलोमीटर भारत भ्रमण करणारा अजय ललवाणी अशा तीन दृष्टीदोष असलेल्या आंध व्यक्तींनी सहभाग घेऊन दिव्यांगा मध्ये उत्साह वाढवला.
कळसुबाई शिखर वीस वेळा सर केलेली पहिली दिव्यांग मुलगी अंजली प्रधान ही देखील सहभागी झाली होती.
सहभागी झालेल्या 40 दिव्यांगा पैकी सहा व्यक्ती अंध, तीन व्यक्ती बहु विकलांग मतिमंद तर इतर दिव्यांग अस्थिव्यंग प्रकारातील होते.

या तीन दिवसीय सागरी मोहिमेदरम्यान तब्बल 40 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास जहाजातून करावा लागला.
बारा वर्षाच्या क्रितीन रुखवाल याने तर सत्तर वर्षाच्या शांताबाई प्रधान या आज्जीने या मोहिमेत सहभाग घेतला.
शिवुर्जा प्रतिष्ठानच्या शिवाजी गाडे, कचरू चांभारे, सागर बोडके, अंजली प्रधान, केशव भांगरे, मच्छिंद्र थोरात, जीवन टोपे, जगन्नाथ चौरे या सदस्यांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

मोहिमेच्या पहिल्या दिवशी 26 फेब्रुवारी रोजी खांदेरी-उंदेरी, खूबलढा व बिरवाडी किल्ल्याची भटकंती करण्यात आली. या किल्ल्यांचा इतिहास, किल्ल्यावरील असलेल्या अवशेषांची माहिती व दुर्ग फेरी करण्यात आली.

मोहीमेच्या दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारी रोजी किल्ले कोरलाई व किल्ले रेवदंडा या ऐतिहासिक जलदुर्गाची भटकंती करण्यात आली.तर मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी किल्ले पद्मदुर्ग कासा, किल्ले जंजिरा तर अलिबागच्या बेटावरील किल्ले कुलाबा या जलदुर्ग किल्ल्यांची भटकंती जहाजा द्वारे करण्यात आली.

या सागरी जलदुर्ग भटकंती मोहिमेत शिवाजी गाडे, कचरू चांभारे, अंजली प्रधान, सागर बोडके, केशव भांगरे, मच्छिंद्र थोरात, जीवन टोपे, जगन्नाथ चौरे, नेहा पावसकर, अजय ललवाणी, अशोक भानसे, डॉक्टर रवींद्र रुखवाल, आरती लिमजे, रितू बारटक्के, नलिन पावस्कर, कुणाल पावसकर, आराधना नाईक, गणेश थोटे, नितीन रुखवाल, शांता प्रधान, मयुरी चौधरी, भारती चौधरी, विजय पाटील, योगिनी पाटील, कैलास दुरगुडे, सतीश आळकुटे, ओम तारू, अश्विनी तारू, कुणाल काळेकर, विवेक गुंड, लक्ष्मण वाघे, मयूर घोंगटे, शबाना आजाद पखाली, काजल कांबळे, पांडुरंग उनवणे, कल्याण घोलप, वैजनाथ देवाळकर, सुरज बटुळे, दादासाहेब पठाडे व जयेंद्र भोईर या 40 दिव्यांगांनी व त्यांच्या सक्षम सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

सागरी भ्रमण साठी आलेल्या दिव्यांगाचे अलिबाग येथे स्वागत महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना अध्यक्ष साईनाथ पवार,रायगड जिल्हा दिव्यांग संघर्ष समितीचे जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्ष अमूलकुमार भलघट यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
सहभागी सर्व सागरी जलदुर्ग वीरांना शिवुर्जा प्रतिष्ठान तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.