Press "Enter" to skip to content

फटाके वाजवून, पेढे भरवून आनंद साजरा

मराठा समाजाच्या मागण्यावरील निर्णयाचे रोह्यातील सकल मराठा समाज बांधवांनी केले जल्लोषात स्वागत

सिटी बेल • धाटाव • शशिकांत मोरे •

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अमलबजावणीसाठी छत्रपती संभाजी राजे मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले होते.गेली तीन दिवस सुरू असलेल्या या उपोषणामुळे या सरकारला त्वरित काही निर्णय घेण्यास भाग पडले.दरम्यान मराठा समाजाच्या मागण्यावरील निर्णयाचे रोह्यातील सकल मराठा समाज बांधवांनी केले जल्लोषात स्वागत करून फटाके वाजवून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी शिफारस झालेल्या एसईबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्मितीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणण्याबरोबरच सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संदर्भातील मागण्यांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

दरम्यान, मंत्री दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे आणि अमित देशमुख यांनी आझाद मैदान येथे उपोषणस्थळी जाऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांना या निर्णयांची जाहीर माहिती दिल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी तीन दिवसांपासून सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे.

अशा विविध मागण्या मान्य केल्याचे वाचन करण्यात आल्याने मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ३ दिवस केलेल्या आमरण उपोषणाला आज अखेर यश आले आहे.याबाबत रोह्यात मारुती चौकात जयघोष करीत फटाके वाजवून,पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्ष प्रदीप (आप्पा) देशमुख,नितीन परब,विजय मोरे,समीर शेडगे यांच्यासमवेत सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

आदरणीय संभाजी राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या मागणीसाठी मागील तीन दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला आमरण उपोषणाच्या माध्यमातून यश आले आहे.त्यांनी यासाठी स्वतच्या प्राणाची बाजी पणाला लावली आणि अखेर सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले.दरम्यान संभाजी राजेंचे आणि सरकारचे आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानत आहोत असे उपाध्यक्ष नितीन परब यांनी उपस्थित पत्रकारांसमोर सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.