Press "Enter" to skip to content

गणेश विसर्जनासाठी पनवेलमध्ये वाहतूक बदल ! १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान विविध मार्गांवर प्रवेशबंदी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन


पनवेल, दि.१७ (वार्ताहर) : गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी पनवेल, खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल परिसरातील काही मार्गांवर वाहतूक बदल जाहीर केले आहेत. संबंधित मार्गांवर सकाळी १० वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक बंद किंवा वळविण्यात येणार आहे.

पनवेल शहर वाहतूक शाखेच्या हद्दीत सावरकर चौक ते वडाळे तलाव (नागफणी) तसेच वडाळे तलावाकडून सावरकर चौकाकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीस प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहनचालकांनी सावरकर चौक–कोर्ट रोड–सहस्रबुद्धे हॉस्पिटल रोड–ठाणा नाका रोड या पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच राम स्नॅक्स कॉर्नर ते वडाळे तलाव हा मार्ग बंद राहणार असून वाहनचालकांनी राम स्नॅक्स कॉर्नर–अशोक गार्डन–देशमुख गल्ली–सावरकर चौक या मार्गाने पुढे जावे.

खांदा कॉलनीतही वाहतूक बदल
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांदा कॉलनी परिसरातील गणेश विसर्जन मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था, सेक्टर ८ येथून महात्मा स्कूलकडे जाणारा मार्ग तसेच श्रीकृपा बँक्वेट हॉल, सेक्टर ६ येथून खांदेश्वर तलावाकडे जाणारा मार्ग गणेश वाहन व ट्रॉलीसाठी बंद राहणार आहे.
एक्सिस बँकेकडून खांदेश्वर तलावाकडे जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डावीकडे वळून पुढे जावे. तसेच आसूडगावकडून एक्सिस बँकेकडे येणाऱ्या वाहनांनी आगरी शिक्षण संस्था शाळा, सेक्टर ६, खांदा कॉलनी परिसरातील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

नवीन पनवेलमध्ये आदई तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर निर्बंध
नवीन पनवेल परिसरात आदई सर्कल–सेक्टर १०–आदई तलाव हा प्रमुख विसर्जन मार्ग राहणार आहे. तुलसी हाईट्स, सेक्टर ५ येथून भावना मेडिकलकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
सेक्टर ५, ६ आणि ७ मधील नागरिकांनी आदई सर्कलकडे जाण्यासाठी नॅशनल कॉम्प्लेक्स–नोंदणी कार्यालय–डी-मार्ट–एचडीएफसी चौक या मार्गाचा वापर करावा. खांदा कॉलनीकडून येणाऱ्या वाहनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलानंतर पोलीस प्लॉट–सेंट जोसेफ स्कूल–सेक्टर ७–सेवेज पंप हाऊस–नोंदणी व मुद्रांक कार्यालय–डी-मार्ट–एचडीएफसी सर्कल या पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जावे.

या दिवशी वाहतूक निर्बंध
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर १८ सप्टेंबरला पाच दिवसांचे गणपती, १९ सप्टेंबरला सहा दिवसांचे गणपती व गौरी, २० सप्टेंबरला सात दिवसांचे गणपती, २३ सप्टेंबरला दहा दिवसांचे गणपती आणि २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीचे विसर्जन होणार आहे. या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत संबंधित मार्गांवर निर्बंध लागू राहतील. तसेच ३० सप्टेंबर रोजी केवळ पनवेल शहर वाहतूक शाखेच्या हद्दीत वाहतूक बदल लागू राहणार आहेत.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.