Press "Enter" to skip to content

“मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!” ; सुरक्षा, समन्वय आणि माणुसकीचा संदेश देणारा धनंजय गीध यांचा अनोखा उपक्रम

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्यानजीक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या प्रोपलीन गॅस टँकरच्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला होता. अपघातानंतर झालेल्या गॅसगळतीमुळे महामार्गावरील हजारो वाहने, प्रवासी तसेच आजूबाजूच्या परिसराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. संभाव्य धोका अत्यंत मोठा असतानाही विविध यंत्रणांनी परिस्थिती संयमाने, कौशल्याने आणि अत्यंत काळजीपूर्वक हाताळल्याने मोठे संकट टळले होते.

या थरारक प्रसंगाची स्मृती आणि त्यातून मिळालेला सुरक्षिततेचा संदेश गणेशोत्सवाच्या देखाव्यातून जनतेसमोर आणण्याचा अनोखा प्रयत्न HELP Foundation चे केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांनी केला आहे. आपल्या घरच्या गणपतीसाठी त्यांनी त्यांच्या पत्नी रश्मी यांचा समवेत कुटुंबीयांच्या सहकार्याने आडोशी बोगद्यानजीक घडलेल्या प्रोपोलिन गॅस टँकर अपघाताचा प्रतिकात्मक देखावा साकारला असून, या उपक्रमाची परिसरात चर्चा सुरू आहे.

या दुर्घटनेच्या वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धनंजय गीध यांनी पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. गॅस गळतीसारख्या अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक परिस्थितीत तांत्रिक ज्ञान, प्रसंगावधान आणि समन्वय यांचे महत्त्व या घटनेत प्रकर्षाने अधोरेखित झाले.

या देखाव्यामागील भावना स्पष्ट करताना, “त्या प्रसंगी सर्व यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमागे श्री गणेशाचा आशीर्वादच असावा,” अशी श्रद्धा धनंजय गीध यांनी व्यक्त केली. संकटातून सुखरूप बाहेर पडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच, महामार्गावरील सुरक्षा आणि शिस्तीबाबत जनजागृती करण्याचा उद्देशही या उपक्रमामागे आहे.

देखाव्यामध्ये आडोशी बोगद्याजवळील अपघाताचे चित्रण करण्याबरोबरच महामार्गावरील सुरक्षितता, वाहतूक शिस्त, आपत्कालीन परिस्थितीतील खबरदारी आणि HELP Foundation च्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली आहे. संकटसमयी विविध यंत्रणांशी समन्वय साधून मदतकार्य कसे केले जाते, याचाही संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

खालापूर तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार अभय चव्हाण हे या देखाव्याला भेट देणार आहेत. तसेच रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह या देखाव्याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन उपक्रमाचे कौतुक केले आहे.

गणेशोत्सवातील हा देखावा केवळ एका भीषण अपघाताची आठवण करून देणारा नसून, सुरक्षा, शिस्त, तांत्रिक सज्जता, प्रशासकीय समन्वय आणि माणुसकी यांचे महत्त्व अधोरेखित करणारा जनजागृतीपर उपक्रम ठरत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.