
पेण (वार्ताहर) : रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील सावरसई गावात गेल्या अनेक वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा कायम ठेवली असून या गणेशोत्सवाला जवळपास २४ वर्ष पूर्ण होत आली आहेत.तर एकीकडे डीजेची संस्कृती आता बंद होत असताना या गावांने याला तेव्हाच धुडकावून विसर्जनामध्ये भजनाची साथ आजवर ठेवली आहे.त्यामुळे या गावातील गणेशोत्सव हा येथील आदर्श मानला जात आहे.
पूर्वीच्याकाळी असणारी सावरसई गावाची आर्थिक परिस्थिती येथे असलेली छोटीशी घरे आणि याच परिस्थितीत गणेशोत्सवात प्रत्येक जण आपापल्या घरी गणपती बसवायचे पण त्यामुळे माणूस माणसाला विसरत चालला की काय हीच भावना मनात ठेवून त्यावेळी सरपंच पदावर असणारे महादेव दिवेकर यांनी आपला गाव एकत्र येऊन आपली माणसं एक संघी राहावी या उद्देशाने सावरसई गावातील ‘एक गाव एक गणपती’ ही प्रथा सुरू केली आणि आजवर ती कायम सुरू असून आजच्या युवा पिढींमध्ये येथील चंद्रकांत दिवेकर, भगवान सावंत, सागर सावंत, माजी पंस.सदस्य नीलकंठ दिवेकर, ग्रामपंचायत सदस्य योगेश दिवेकर, समीर सावंत, गणेश भोरडे, नरेश चिंबोरे, स्वप्निल भोरडे, मनिष जठार, शशिकांत जठार, संतोष बैकर, रविंद्र चिंबोरे, संतोष पवार, सचिन जाधव आदिंनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असून गणेशोत्सवाच्या या २४ व्या वर्षात दररोज भजन, किर्तन, ग्रामस्थांचे एकत्र जेवण, नाच गाणी तसेच महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.तर पाच दिवस असणाऱ्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाला गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येत भजनाच्या निनादात बापदेव तलावात गणपतीचे पारंपारिक पद्धतीने विसर्जन केले जाते.त्यामुळे सावरसई ने ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा आजवर जपली आहे.
सावरसई गावाच्या गणेशोत्सवाला २४ वर्ष पूर्ण होत असताना आमची संस्कृती आम्ही जपून ठेवली आहे.या गावात ‘एक गाव एक गणपती’ बसविण्याची सुरुवात केली असून आता गावातील सर्व तरुण पिढी यासाठी एकत्र झटत आहेत.एका संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासत येथे मंदिर बांधून दिले या मंदिरात गणपती बसत असून पुढील वर्षी २५ वर्ष होत असल्याने यापेक्षाही अधिक सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस आहे.पाच दिवसांनंतर गणपती विसर्जन होत असताना डीजे वाद्य न लावता आजवर भजन संस्कृतीची जपणूक ठेवली आहे.
- महादेव दिवेकर- माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सभापती




Be First to Comment