Press "Enter" to skip to content

सव्वा महिन्याच्या पावसाच्या दडीने बळीराजा उद्ध्वस्त ! मका, सोयाबीन, कापूस पिके करपली ; उशिरा बरसलेल्या पावसानेही नुकसान भरून निघण्याची आशा मावळली


जळगाव (आनंद पवार)

उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात यंदा पावसाने शेतकऱ्यांची अक्षरशः परीक्षा घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यासह अनेक भागांत सव्वा ते दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने मका,सोयाबीन,कापूस आणि अन्य खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून,मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे बळीराजा अक्षरशःहवालदिल झाला आहे.

पिकांची चांगली वाढ होण्यासाठी पावसाची नितांत गरज असताना ऐन हंगामात पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतली.त्यामुळे शेतातील जमिनीतील ओलावा कमी झाला आणि अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली.मका व सोयाबीनची पाने वाळली,तर कापूस पिकावरही पावसाच्या खंडाचा गंभीर परिणाम झाला आहे.अनेक शेतांमध्ये पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या पदरी यंदा उत्पादनाऐवजी निराशाच येण्याची भीती निर्माण झाली आहे.

मोठा खर्च करूनही पदरी निराशा
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बियाणे,खते, औषधे,फवारणी , मशागत,मजुरी यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला.यंदा चांगले उत्पादन मिळेल आणि वाढत्या खर्चाचा काही प्रमाणात भार हलका होईल,अशी अपेक्षा होती.मात्र पावसानेच दगा दिल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे.एकीकडे शेतीचा वाढता खर्च,दुसरीकडे पावसाची अनिश्चितता आणि तिसरीकडे पिकांचे घटलेले उत्पादन,अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता तर अधिकच वाढली आहे.

दीड महिन्यानंतर पाऊस;मात्र उशिरा आलेल्या पावसाचा कितपत फायदा ?
जवळपास सव्वा ते दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी पावसाने हजेरी लावली.त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी,ज्या काळात पिकांना पावसाची सर्वाधिक आवश्यकता होती,त्याच काळात पाऊस गायब राहिल्याने झालेले नुकसान आता भरून निघणे कठीण असल्याचे चित्र आहे.दीर्घकाळ पावसाने दडी मारल्यानंतर झालेला पाऊस काही पिकांसाठी उशिराचा ठरत आहे. त्यामुळे पावसाचे आगमन झाले असले तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अपेक्षित आनंद दिसत नसून,नुकसान किती झाले याचीच चिंता त्यांना सतावत आहे.

शेतकऱ्यांची शासनाकडे तातडीची मागणी
पावसाच्या दीर्घ खंडामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी तसेच पीकविमा नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी,अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळणार का?
निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकऱ्यांवर संकटांची मालिका कोसळत आहे.यंदाही पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन आता केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष मदतीचा हात कधी पुढे करणार,असा सवाल पारोळा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित करीत आहेत.
पावसाच्या प्रतीक्षेत करपलेली पिके,वाढता शेतीचा खर्च आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने खानदेशातील बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडला आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.