Press "Enter" to skip to content

महिलांमध्ये वाढलेले वजन ठरतेय घातक !!

डिजिटल युगामध्ये शहरातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत अनास्था

सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •

फेब्रुवारी महिन्यात साजरा झालेल्या जागतिक कर्करोग दीनानिमित्त नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर तर्फे केलेल्या एका सर्वेक्षणात ३० ते ७० वर्षे वयोगटातील स्त्रियांना स्तनांचा कर्करोग कोणत्या कारणांमुळे होतो याची पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणात म्हणजेच आरोग्य तपासणीत मुंबईतील विविध सामाजिक, आर्थिक गटांतील १५० महिलांचा समावेश होता.

या सर्वेक्षणातील निकष चिंताजनक असून आजच्या डिजिटल युगामध्ये शहरातील महिलांमध्ये आरोग्याविषयी अनास्था आढळून आली आहे. याचसोबत जंकफूड‘चा मारा, चुकीची आहारपद्धती, जागरणे, अनावश्‍यक मानसिक तणाव व लॉकडाउन मध्ये वाढलेले अतिरिक्त वजन अशा विविध कारणांमुळे स्तनांचा कर्करोग होण्याची शक्‍यता बळावत आहे. सकस आहार, पुरेशी विश्रांती आणि वेळीच घेतलेली वैद्यकीय मदत यामुळे ही व्याधी टाळता येते. परंतु आजमितीला शहरातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी अजूनही गंभीरता आलेली नाही असे दिसून आले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे लॅप्रोस्कॉपीक सर्जन व वजन घटवणाच्या शस्त्रक्रिया करणारे शल्य चिकित्सक डॉ. नितीन तवटे म्हणाले, “आम्ही केलेल्या वैद्यकीय निरीक्षणामध्ये शंभरामध्ये फक्त १० महिलांना महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची योग्य माहिती माहित होती, याचाच अर्थ शहरामध्ये ४० पैकी एका महिलेला संभ्याव स्तनाच्या कर्करोगाची भीती असूनही महिलांमध्ये याविषयी अजूनही जागरूकता आलेली नाही.

या शिबीरात भाग घेतलेल्या महिलांपैकी ५०% महिला वजनाने जास्त होत्या. वजन वाढल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढते व या चरबीमुळे पोटातील आतल्या भागाला सूज येते, म्हणजे ‘इन्फ्लेमेशन’ होते. या इन्फ्लेमेशनमुळे जी रसायने शरीरात तयार होतात, ती पेशींच्या डीएनएला व पेशींच्या चयापचयाला म्हणजे ‘मेटॅबॉलिझम’ला हानिकारक असतात. जाडेपणा हळूहळू वर्षानुवर्षे वाढत असतो. त्यामुळे ही रसायने शरीरात भिनतात व कर्करोगाचा धोका वाढतो .”

शरीरात होणाऱ्या विविध कर्करोगांमध्ये स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण २५ टक्के असले तरीही याबाबत आजही या रोगाबाबतच्या जनजागृतीचा अभाव, स्व:तपासणीचा अभाव, सांस्कृतिक तफावत व महिलांच्या आरोग्याविषयी असलेली अनास्था यामुळे भारतातील शहरांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यातच स्थूलता हे शहरी भागातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोग होण्यासाठी प्रमुख कारण समोर येत आहे.

गेल्या २५ वर्षांत महिलांमधील कर्करोगाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. प्रत्येक वर्षी एक लाख तीस हजार नव्या रुग्णांची नोंद होते. कर्करोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांत महिलांचे प्रमाण शहरात ३० टक्के आणि ग्रामीण भागात ९ टक्के इतके दिसून येते अशी माहिती शल्यचिकित्सक डॉ. नितीन तवटे यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.