Press "Enter" to skip to content

डॉ.सी.डी.देशमुख शहर सभागृहाचे भूमिपूजन

रोह्यातील हे सभागृह डॉ. सी.डी.देशमुखांच्या कर्तृत्वाला साजेसे असावे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

डॉ. सी.डी. देशमुख नावाच्या बागेसाठी निधी देण्याची ना. अजितदादा पवारांची घोषणा

सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •

माझ्या महाराष्ट्राच्या एका थोर पुरुषाची आठवण म्हणून रोहे अष्टमी नगरपरिषदेने रोह्याचे थोर सुपुत्र डॉ. सी.डी. देशमुख साहेबांच्या नावाने शहर सभागृह बांधण्याचे जे काम हाती घेतले आहे त्याबद्दल नगरपरिषद अभिनंदनास पात्र आहे. कोणतेही बांधकाम हे १०० वर्षे टिकणारे आसावे मात्र आधीचे सभागृह २०-२२ वर्षांतच तोडावे लागल्याने आता चांगला ठेकेदार बघा. सध्या जरी या सभागृहासाठी ५ कोटी नगरपरिषदेला देण्यात आले असले तरी आलेला निधी संपवलात की, पुढचा निधी देण्याची जबाबदारी माझी असेल. मात्र बांधकामात कोणतीही तडजोड न करता १०० वर्षे टिकेल असे बांधकाम करून हे सभागृह डॉ. सी.डी. देशमुख साहेबांच्या कर्तृत्वाला साजेसे असे असावे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कधीच कमतरता भासू दिली जाणार नाही असे ठोस आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दिले. त्याचबरोबर डॉ. सी.डी. देशमुख साहेबांनी लंडन मधील त्यांच्या घराला “रोहे” हे नाव दिले होते. ते जिथे जिथे वास्तव्यास राहिले तेथे त्यांनी बाग फुलविली होती. त्यामुळे याचीच आठवण म्हणून येथेही डॉ. सी.डी. देशमुख साहेबांच्या कामाला शोभेल अशी त्यांच्या नावाची बाग तयार करा त्यासाठी लागेल तो निधी मी देईन असे आश्वासनही यावेळी ना. अजितदादा पवार यांनी रोहेकरांना दिले.

रोहे शहराचा मानबिंदू असलेल्या डॉ. सी.डी. देशमुख शहर सभागृह- नाट्यगृहाचे भूमिपूजन ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते रविवारी(दि.२७) सकाळी करण्यात आले. त्यानंतर येथील कुंडलिका नदीसंवर्धन प्रकल्पाच्या प्रशस्त मैदानवर संपन्न झालेल्या सभेत ते बोलत होते. रायगडचे खासदार सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड, महिला जिल्हाध्यक्षा गीताताई पालरेचा, राजिपचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, रोहे न.पा.चे प्रशासक दयानंद गोरे, विजयराव मोरे, मधुकर पाटील, विनोदभाऊ पाशिलकर, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, रामचंद्र सकपाळ, सुरेश मगर, जयवंत मुंडे, गीताताई जाधव, प्रीतम पाटील आदींसह अनेक मान्यवर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी ना. अजितदादा पवार यांनी देशाचे पहिले अर्थमंत्री व रोह्याचे सुपुत्र डॉ. सी.डी. देशमुख यांच्या कर्तृत्वाचा आलेख थोडक्यात सादर केला. याचबरोबर सध्या राज्यात, जिल्ह्यात सुरु असलेल्या, आपापसांत करण्यात येणाऱ्या हीन दर्जाच्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. आपली भूमिका मांडण्याचा अधिकार संविधानाने, कायद्याने व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. पण महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा काय आहे याचे भान ठेऊन प्रत्येकाने वागावे व आपला सुसंस्कृतपणा सोडू नये तसेच आपल्यासमोर सध्या काय आ वासून उभे आहे ते महत्वाचे की, एकमेकांचे वाभाडे काढणे महत्वाचे आहे. याची खबरदारी सर्वांनी ठेवणे गरजेचे असल्याचेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. आपल्या मनोगतात ना. अजितदादा पवार यांनी आपली मुलगी पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचे सांगून त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक करून नागरिकांनी योग्य व्यक्तीला संधी दिल्याचे सांगितले.

बारामती सारखी पंचायत समितीची इमारत रोह्यात व्हावी : खा. सुनील तटकरे

रोहातील कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प असो की, दिवेआगरचे सुवर्ण गणेश मंदिर असो… आम्ही केलेली कामे दादांच्या पसंतीला उतरतात त्यामुळे ते कधीही आम्ही सुचविलेल्या प्रस्तावाला मंजुरू देत असतात. त्यामुळेच दादांच्या अध्यामांतून जिल्ह्यातील अनेक कामे मार्गी लागली आहेत. रोहा पंचायत समितीची स्थापना झाली त्यावेळी स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे पहिले सभापती झाले. त्यानंतरच्या ६० वर्षांतील ५५ वर्षे रोहा पंचायत समिती आपल्याकडे आहे. मात्र पंचायत समितीच्या इमारतीची दुरवस्था पाहता बारामतीच्या पंचायत समितीच्या इमारती सारखी इमारत रोह्यात व्हावी अशी इच्छा यावेळी खा. सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे व्यक्त केली.

संपूर्ण राज्यात नसेल असे नाट्यगृह तयार होईल : ना. आदितीताई तटकरे

डॉ. सी.डी. देशमुख शहर सभागृहाला १९८६ ला मान्यता मिळाल्यानंतरही निधीअभावी काम ठप्प झाले. मात्र नंतर पवार साहेबांच्या कृपेने आघाडी सरकार मध्ये तटकरे साहेब नगरविकास राज्यमंत्री झाल्यानंतर या सभागृहाचे काम मार्गी लागले. मात्र त्यामध्ये वारंवार दुरुस्ती करूनही हे सभागृह वापरण्यायोग्य नसल्याचा अहवाल नगरपरिषदेस प्राप्त झाल्याने हे सभागृह तोडावे लागले. मात्र नव्याने होणारे हे सभागृह व नाट्यगृह हे लायब्ररी, ई लायब्ररी, कॅफेट एरिया, कलाकारांचे निवासस्थान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशा विविध प्रकारे बहुगुण संपन्न व संपूर्ण राज्यात नसेल अशाप्रकारे तयार झालेले असेल असे यावेळी ना. आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात आपल्या मार्गदर्शनाखाली विकास कामे करण्याची संधी या रोह्याच्या कन्येला मिळावी अशी वीनंती ना. आदितीताई तटकरे यांनी अजितदादा पवार यांना केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. अनिकेतभाई तटकरे यांनी केले तर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक दयानंद गोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.