Press "Enter" to skip to content

नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी

छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे आणि संतांच्या भुमीचे प्रतिनिधीत्व करताना रास्त अभिमान वाटतो : रायगड पालकमंत्री आदिती तटकरे

सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •

तालुक्यातील नरवीर तानाजी मालुसरे, नरवीर सुर्याजी मालुसरे यांच्या पुण्यभुमीसाठी रायगडच्या पालकमंत्री पदाच्या आणि पर्यटन खात्याच्या माध्यमातून भरीव निधीची तरतूद करून दिली असून छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे आणि संतांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेल्या भुमीचे राज्यात प्रतिनिधीत्व करताना रास्त अभिमान वाटतो. आगामी काळात चांगल्याप्रतीचे पर्यटनविकासाचे काम उमरठ परिसरामध्ये घडून येईल, अशी ग्वाही रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी दिली.

सकाळपासून उमरठ गावात उत्साह संचारलेला दिसून येत असताना सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे व शेलारमामा यांच्या समाधीला अभिषेक मनोहर कळंबे आणि संजय महाराज कळंबे यांच्याहस्ते तर पूजाविधी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे आणि युवासेना अध्यक्ष संजय कळंबे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण इंद्रजित कळंबे तर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण जयराम मोरे यांच्याहस्ते अर्पण करण्यात आला.

सकाळी नरवीरांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केल्यानंतर पालखीची भव्य मिरवणूक पुतळयापासून समाधीस्थळापर्यंत निघणार असून छत्रपतींचा इतिहास, पोलादपूरसह कोकणातील महत्वाची पर्यटन स्थळं, युध्द साहित्य व क्षेपणास्त्रे, पोलादपूर तालुक्यातील शहिदांची गाथा, निसर्ग संपदा, झुलता पूल, मोरझोत धबधबा व भीमाची काठी लाईव्ह या तब्बल दहा चित्ररथांमध्ये तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, नरवीर रेस्क्यू टीम, कृषी विभाग, पंचायत समिती व इतर विभागांचा भरगच्च सहभाग दिसून आला.

जागतिक ख्यातीचे विंचू दंश तज्ञ डॉ. हिंमतराव बावस्कर यांना यंदाचा नरवीर तानाजी मालुसरे शौर्य पुरस्कार 2022 प्रदान करताना महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले, सोबत तालुकाप्रमुख निलेश अहिरे, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, लक्ष्मण मोरे, रामदास कळंबे, डॉ. शीतल मालुसरे व रायबा मालुसरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांचे पुण्यतिथी सोहळ्यास्थळी आगमन झाले.

यावेळी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके व शिवशाहिर वैभव घरत यांचा शाहिरी पोवाडा झाल्यानंतर दुपारी पुण्यतिथी सोहळयास्थळी रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांचे आगमन झाले. प्रारंभी पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीस्थळी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळयाला साष्टांग दंडवत घालून अभिवादन केले.

यावेळी नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी उत्सव समितीचे अध्यक्ष व राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, पद्मश्री डॉ.हिंमतराव बावस्कर, कोकण क्लबचे संजय यादवराव, राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष वाय.सी.जाधव, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा प्रतिभा पवार, शहरअध्यक्ष अजित खेडेकर, कृषी उत्पन्न बाजार समिचे संचालक लक्ष्मण मोरे, डॉ.शीतल मालुसरे आणि नरवीरांचे वंशज रायबा मालुसरे, आयपीएस अधिकारी डीवायएसपी निलेश तांबे, नरवीर रेस्क्यू टीमचे रामदास कळंबे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

नरवीर तानाजी मालुसरे रेस्क्यू ऍंड ऍडव्हेंचरचे उदघाटन पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्याहस्ते नैसर्गिक आपत्तीकाळात मदत केलेल्या संस्था व व्यक्तींचा सत्कार, पुण्यतिथी सोहळयामध्ये विविध चित्ररथ सादर करणाऱ्या प्राथमिक माध्यमिक शाळांचा सत्कार, डीवायएसपी निलेश तांबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यानंतर महाड व पोलादपूर तालुक्यातील वास्तव्य काळात विंचूदंश उपचारपध्दती तसेच कोरोनावरील उपचारपध्दतीवर अभ्यासपूर्ण संशोधन करून जागतिक स्तरावर पोहोचविणारे तसेच नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहिर झालेले डॉ.हिंमतराव बावस्कर यांना रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांच्याहस्ते यंदाचा सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे शौर्य सेवा पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.