Press "Enter" to skip to content

२०३५ साली भारत कर्करोगाची राजधानी होणार

अल्पवयीन मुलांमध्ये वाढलेले तंबाखूचे व्यसन भारतामध्ये वाढवत आहेत कर्करोगाचे रुग्ण

सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •

तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: १० लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: ३६ टक्के पुरुष व ६ टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तर आता अल्पवयीन मुलांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढत चालल्याचे दिसत आहे. राज्यात केलेल्या एका सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार कुटुंबामध्ये ७.८ टक्के तर, सार्वजनिक ठिकाणी २२ टक्के मुले ही अन्य माध्यमातून उपलब्ध झालेल्या तंबाखूसेवनाची बळी असतात.

ग्लोबल अँडल्ट टोबॅको सर्वेक्षणानुसार भारतामध्ये दरवर्षी १५ ते १७ वयोगटातील मुलांमध्ये ४ ते ५ टक्क्यांनी तंबाखू सेवनामध्ये वाढ होत असते. शाळेच्या परिसरामध्ये तंबाखू तसेच, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने, टपऱ्या यांच्यावर निर्बंध घालण्यात आले असले तरीही ते पूर्णपणे नियंत्रणात आलेले नाही. शिक्षणसंस्थाच्या परिसरात मिळणारे तंबाखूजन्य पदार्थ पाहता तंबाखू विक्रेत्यांसंबंधी धोरणामध्ये बदल करण्याची गरज आहे नाहीतर भविष्यात कर्करोग रुग्णांची संख्या वाढीस लागणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे कर्करोग तज्ञ डॉ. अमित गांधी सांगतात, ” भारत सरकारच्या नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनने केलेल्या सर्वेक्षणानुसार १०-१४ वयोगटातील सुमारे २० दशलक्ष मुले तंबाखूच्या व्यसनाधीन असल्याचा अंदाज आहे. या आश्चर्यकारक आकड्यात, दररोज सुमारे पाच हजाराहून अधिक नवीन मुले जोडली जातात व या आकडेवारीनुसार दरवर्षी दोन दशलक्ष अल्पवयीन मुले तंबाखूच्या आहारी जातात. हि आकडेवारी अशीच सुरु राहली तर भारत देश हा कर्करोगाचे मुख्य केंद्रस्थान बनेल. तंबाखू मुळे फक्त तोंडाचाच कर्करोग होतो असे नाही त्यापासून लिव्हर, स्वादुपिंड, फुप्फुस, स्वरयंत्र, जठर, गर्भ पिशवी, घशाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.महाराष्ट्रातील किती कोटी जनता ही तंबाखूचे सेवन करते हे सांगणे मुश्किल आहे परंतु यातील अनुमानीत ७० टक्के नागरिकांना काळाअगोदरच कर्करोगासारख्या भयानक आजाराला सामोरे जावे लागणार आहे. तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांमध्ये सेवन सुरू केल्याच्या १२ ते १३ वर्षांनंतरच कॅन्सर आढळतो. आमच्याकडे असेही ग्रामीण तरूण येत आहेत जे स्मोकलेस टोबॅको म्हणजे पान, तंबाखू, खैनी, गुटखा सारख्या गोष्टींचं अगदी कमी वयात सेवन करतात. अशा तरुणांचे योग्य वेळी समुपदेश करून त्यांना व्यसनापासून परावृत्त केले पाहिजे कारण ४० टक्के प्रकरणांमध्ये कॅन्सरचा संबंध तंबाखू सेवनाशी असल्याचे वैद्यकीय निरीक्षणातून समोर आले आहे.”

२०३५ पर्यंत कॅन्सरची प्रकरणं वाढतील आणि ही संख्या १० लाखांवरून वाढून १७ लाख होईल असं लॅन्सेट जर्नलमध्ये म्हटलंय. जर एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती कॅन्सरपीडित असेल तर त्याच्या उपचारांसाठी ५० ते ७० टक्के लोक कर्ज घेतात किंवा घर व दागिने विकतात. त्यामुळे ३ ते ५ टक्के लोक कर्करोगाच्या उपचारांमुळे दारिद्र्यरेषेखालील जातात असं लॅन्सेट या अहवालात सांगितले आहे. अल्पवयीन मुलांना व्यसनी बनवणार्‍या सवयीला आपण आवर घातली पाहिजे आणि नवीन येणार्‍या तरुण पिढीला त्यापासून होणार्‍या दुष्परिणामाची माहिती दिली पाहिजे. त्यांना या सर्व प्राणघातक पदार्थांपासून दूर ठेवणे हि काळाची गरज आहे असे मत कर्करोगतज्ञ डॉ.अमित गांधी यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.