कर्जत तालुक्यात कातकरी उत्थान व सप्तसूत्री अंतर्गत आदिवासी बांधवांना विविध दाखल्यांचे वाटप
सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
कर्जत तालुक्यात कातकरी उत्थान व सप्तसूत्री अंतर्गत कातकरी आणि आदिवासी बांधवांना विविध प्रकारच्या 994 दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
रायगड जिल्हा हा पश्चिमेकडील अरबी समुद्र व पूर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगर रांगा यामुळे भौगोलिक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे, रायगड जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 11.58 टक्के लोकसंख्या आदिवासी बांधवांची आहे, त्यापैकी 40 टक्के लोकसंख्या कातकरी बांधवांची आहे.

शासन स्तरावरून आदिवासींचा आर्थिक सामाजिक विकास करण्याकरिता अनेक योजना राबवल्या जातात परंतु तरीही आदिवासी बांधव अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत, रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून एक सप्तसूत्री निश्चित करण्यात येत आहे, त्या माध्यमातून आदिवासींच्या कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शन व नियंत्रण केले जाणार आहे.
आदिवासी बांधवांकरता अस्तित्वात असलेल्या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळण्याकरिता शासनाच्या सर्व विभागाचा समन्वय असणे आवश्यक आहे, याकरिता जिल्हा स्तरावर जिल्हा आदिवासी कल्याणकारी समन्वय समिती, तालुकास्तरावर तालुका आदिवासी कल्याणकारी समन्वय समिती व ग्रामपंचायत स्तरावर ग्राम आदिवासी कल्याणकारी समन्वय समिती अशा तीन समित्यांची स्थापना करण्यात आल्या आहेत

रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यात कर्जत येथे कातकरी उत्थान व सप्तसूत्री अंतर्गत उपविभागीय अधिकारी (प्रांत) अजित नैराळे यांच्या हस्ते कातकरी आणि आदिवासी बांधवांना 994 विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले, प्रसंगी कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, पुरवठा विभाग नायब तहसीलदार बी. टी. बुरसे उपस्थित होते.यावेळी जातीचे प्रमाणपत्र – 459, रेशन कार्ड – 170, रहिवासी दाखले – 192, उत्पन्नाचे दाखले – 173 असे एकूण 994 दाखले वाटप करण्यात आले अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.








Be First to Comment