चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या जागांचा प्रश्न क्लिष्ट :- मानसी दळवी
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
कै. गिरिधर गोसावी पाटील चिखली आरोग्य केंद्र प्रवेशद्वाराचे उद्घाटन व लोकार्पण जिल्हा परिषद गटनेत्या मानसी दळवी यांच्या हस्ते पार पडले. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या जागांचा प्रश्न क्लिष्ट आहे. मात्र आगामी काळात जिल्हा परिषद अध्यक्ष झाले तर हा प्रश्न कायमचा मार्गी लावेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
नागोठणे पेजारी रस्त्यावर वसलेल्या चिखली या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेकडून कोट्यवधी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. मात्र रुग्णालय ज्यांच्या जागेवर उभे आहे त्यांच्या नावाने म्हणजेच कै. गिरिधर गोसावी पाटील त्यांचे नाव आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसी दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र हा विषयच वादग्रस्त असून जागेच्या बाबतीत आपण जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला असल्याचे दळवी यांनी सांगितले. तर चिखली हा भाग तसा दुर्गम आहे. शहरापासून लांब असल्याने रुग्णांच्या सोयीसाठी येथे रुग्णालय असावे म्हणून उत्तम पाटील कुटुंबाने जागा दिली होती. येथील बांधकाम चांगले आहे मात्र तशीच येथे रुग्ण सेवा घडावी अशी आशा मानसी दळवी यांनी व्यक्त केली तर आता कुणी दाते राहिले नाहीत, पूर्वी शाळा, रुग्णालय यासाठी लोकांनी आपल्या जागा दान केल्या मात्र त्या आजही त्यांच्या नावावर आहेत.

जिल्हा परिषदेने प्रक्रिया पूर्ण न केल्याने आता ज्या ठिकाणी विद्यार्थी पट नसल्याने शाळा बंद आहेत त्या जागा त्यांचे मालक परत मागत असल्याचे चित्र आहे. असे अनेक प्रकार आहेत तेव्हा आगामी काळात जिल्हा परिषद अध्यक्ष झाले तर पहिला हा विषय मार्गी लावेल असे आश्वासन मानसी दळवी यांनी देतानाच जिल्हा परिषदेचे वास्तू असेल तर त्याला जिल्हा परिषदेचे नाव द्यावे असे देखील सूचित केले.
१९८५ साली चिखली येथे रुग्णालय मंजूर झाले. मात्र जागेचा प्रश्न होता तेव्हा उत्तम पाटील कुटुंबाने जागा दिली होती. विनामूल्य जागा देऊनही जागेचा मालक उपेक्षित होता. त्यामुळे येथील प्रवेशद्वाराला उत्तम पाटील यांच्या वडिलांचे नाव देऊन त्याचे आज उद्घाटन करण्यात आले ही अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन कुसुंबळे ग्रामपंचायत सदस्य जीवन पाटील यांनी केले. तर प्रभाकर पाटील यांच्यामुळे हे खरं तर हे रुग्णालय झाले. प्रभाकर पाटील यांचे विचार वेगळे होते खर ती व्यक्ती वेगळी होती. मात्र आताच्या पिढीला त्यांची जाण नाही अशी खंत उत्तम पाटील व्यक्त केली. तसेच या प्रवेशद्वारासाठी कोणताही शासकीय निधी नाही तर राजा केनी यांनी स्वखर्चाने हे प्रवेशद्वार उभे केले याबद्दल मी त्यांच्या ऋणात असल्याची भावना उत्तम पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी रायगड जिल्हा परिषद गटनेत्या, मानसी दळवी, शिवसेना तालुका प्रमुख राजा केणी, ग्रामपंचायत सरपंच मीना लोभी, उपसरपंच रसिका केणी, सदस्य जीवन पाटील, उत्तम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला शेळके, सुनंदा पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील, शिवसेना महिला आघाडी संघटिका रेश्मा जोशी, युवासेना अधिकारी कुर्दुस विभाग संकेत पाटील, प्रमोद पाटील, अर्चना पाटील, जागृती पाटील, सतीश पाटील, उद्धव कुथे, शैलेश पाटील, विभाग प्रमुख योगेश जुईकर, विकास नीलकर, आरोग्य केंद्र कर्मचारी आदी उपस्थित
७ वर्षात ताजमहाल बांधून झाला असता…राजा केणी
स्थानिक जिल्हा परिषद सदस्य या येथील मतदारसंघाचे १० वर्ष नेतृत्व करतात. मात्र या कार्यकाळात त्यांनी फक्त दोन काम केली एकतर चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र व दुसरे पोयनाड ते संबरी रस्त्यावर पथदिवे उभे केले. त्यात चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करताना ७ लागली. या ७ वर्षात ताजमहाल बांधून झालं असता मात्र त्यात ७ वर्ष एक प्राथमिक आरोग्य केंद्र बांधायला लागला अशी टीका शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी यांनी केली. तर येथील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य हे सांगतात आम्ही एवढी काम केली की आम्ही लोकांच्या समोर पुन्हा जाऊ शकतो मात्र लोक वाटच पाहतात तुम्ही फक्त उभे रहा अशी तोफही केणी यांनी यावेळी डागली.








Be First to Comment