Press "Enter" to skip to content

चोचिंदे येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मंदिरात पुण्यतिथी साजरी

हिंदू धर्माची ओळख देण्याचे काम सोनाराने कान टोचावे हाच संस्कार सोनार समाजाचे भूषण : ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर

सिटी बेल • महाड • प्रतिनिधी •

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावेळी 32 मण सोन्याचे सिंहासन बांधणे आणि हिंदू धर्मातील प्रत्येकात एक कान टोचण्याचे काम सोनारानेच करणे हे सोनार समाजाचे भूषण आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी व्यक्त केले.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सीमावर्ती भागात असलेल्या महाड पोलादपूर माणगाव मंडणगड दापोली खेड तालुक्यातील विश्वकर्मा पांचाळ सोनार समाजाच्या भगिनी आणि बांधवांच्या उपस्थितीत महाड तालुक्यातील चोचिंदे गावामध्ये श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मंदिरामध्ये आयोजित पुण्यतिथी उत्सवात पत्रकार शैलेश पालकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर समाजाचे अध्यक्ष दिगंबर नगरकर, ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर पालकर, लक्ष्मण पोतदार, वसंत नगरकर, प्रदीप नगरकर, प्रदीप चिखलकर तसेच अन्य समाजबांधव तसेच कार्याध्यक्षा मंगला नगरकर आणि महिला सदस्या जयश्री नगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मन बुध्दीची कातरी। रामनाम सोने चोरी॥ हा विचार संत नरहरी महाराजांनी समाजाला दिला तर दुसरीकडे ‘रामनाम जपना पराया माल अपना’ अशी भूमिका असल्यास समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वच्छ राहणार नाही, असे सांगून पत्रकार शैलेश पालकर यांनी सोने हॉलमार्कचे झाल्याने वाल्याकोळीच्या भुमिकेतून बाहेर येऊन वाल्मिकी व्हावे, असे मत मांडले.

याप्रसंगी सोनार समाजातील व्यावसायिक मार्गदर्शक सुधीर सागवेकर यांनी, सोनार व्यवसाय करताना अनेक प्रमाणपत्र आणि पात्रता अंगी असण्याची आवश्यकता राज्य आणि केंद्रसरकारकडून व्यक्त झाल्यानंतर पोलादपूरचे दीपक पालकर यांनी या सर्व प्रमाणपत्र आणि पात्रता प्राप्त करून समाजातील सुवर्णकार व्यावसायिकांसमोर आदर्श ठेवला आहे, असे सांगून ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर पालकर यांच्याहस्ते प्रदीप चिखलकर यांना गोल्ड व्हॅल्यूएशन प्रमाणपत्राचे वितरण केले. याप्रसंगी सोनार समाजातील अनेक मान्यवर भगिनी आणि बांधवांनी विचार मांडले.

याप्रसंगी समाजाचे विन्हेरे, बिरवाडी, वलंग, शिंदेकोंड, वीर, पोलादपूर, चोचिंदे, माटवण, इंदापूर, गोरेगांव, महाड, नडगांव व दासगांव येथील विभागप्रमुख तसेच ज्येष्ठ नागरिक आणि गुणवंत महिला व विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सकाळी चोचिंदे येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या मुर्तीवर अभिषेक, पुष्पवृष्टी, ध्वजारोहण, किर्तन, वार्षिक मिटींग, महाप्रसाद आणि हळदीकुंकू समारंभ आदींचे आयोजन करण्यात आले. महाडचे सिध्दार्थ नगरकर यांनी यावर्षी सपत्नीक पुजाविधी केला.

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये महिलांसाठी बचतगट तसेच महिला मंडळ सक्रीय करण्याचा मनोदय व्यक्त करून प्रत्येक गावातील प्रत्येक घरामधील समाजबांधवांसोबत संपर्क साधण्याचा सतत प्रयत्न करू, अशी ग्वाही समाजाचे अध्यक्ष दिगंबर नगरकर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये व्यक्त केले. कोविड-19च्या नियमांना अनुसरून श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या पुण्यतिथी सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.