Press "Enter" to skip to content

उरणमधील वाहतूककोंडीची समस्या कायम

वाहतूक शाखेचा कोंडी सोडविल्याचा दावा ठरला फोल

सिटी बेल • उरण • प्रतिनिधी •

अनेक वर्षांपासून जनतेला भेडसावणाऱ्या या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात पत्रकारांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी वाहतूक शाखेचे गायकवाड यांनी वाहतूक कोंडी होत नसल्याचा दावा केला होता. तो पुन्हा एकदा फोल ठरला असल्याचे दिसत आहे.

उरण तालुका मराठी पत्रकार संघाने या वाहतूक कोंडी संदर्भात आवाज उठवीत उरणमधील अनधिकृत कंटेनर यार्ड बंद करण्याची मागणी लावून धरली होती. या संदर्भात तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली होती. त्यावेळी करळ चौकी येथील वाहतूक शाखेचे प्रमुख गायकवाड यांनी वाहतूक कोंडी होत नसल्याचा दावा केला होता.परंतु गेले दोन दिवसांपासून धुतुम ते उरण परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसत असल्याने हा दावा फोल ठरला आहे.

उरण-जेएनपीटी-आम्रमार्ग, उरण-पनवेल आणि गव्हाणफाटा-चिरनेर मार्गावर दररोज प्रवास करणाºया हजारो प्रवाशांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढती रहदारी आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. वाहतूककोंडीच्या समस्येविरोधात मागील काही वर्षांत अनेक आंदोलनेही झाली आहेत. मात्र, अद्याप ही समस्या जैसे थे आहे.उरण परिसरातील वाहतूककोंडीची अनेक कारणे आहेत.

जेएनपीटीने एनएचआयच्या माध्यमातून तीन हजार कोटींची सुरू असलेले सात उड्डाणपूल, सहा-आठ लेनच्या रस्त्यांचीच कामे मुदतीनंतर अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. बेशिस्त कंटेनर वाहतूक आणि रस्तोरस्ती अवैधरीत्या पार्किंग करण्यात येत असलेल्या वाहनांवर पोलिसांचे नियंत्रण नाही. रस्तोरस्ती पडलेले मोठमोठे खड्डेही वाहतूककोंडीस कारणीभूत ठरत आहेत. येथील वाहतूकदार संघटनांवर जेएनपीटीचा कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. वाहतूकदारांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न केल्यास संघटित वाहतूकदार संपाचे हत्यार उपसतात.

परिसरातील अवैध कंटेनर यार्डमधून कंटेनर मालाची देशभरात वाहतूक केली जाते. अशा मालवाहू कंटेनरसाठी रस्तोरस्ती कट देण्यात आले आहेत. मात्र, यामुळे उरण-जेएनपीटी-आम्रमार्ग, गव्हाणफाटा-चिरनेर मार्गावर वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते.जनतेला भेडसावत आलेली वाहतूककोंडीची समस्या आणि खड्डेमय रस्त्यांपासून विद्यार्थी, कामगारांची सुटका व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

उरण तालुका मराठी पत्रकार संघाने दिलेल्या निवेदना नंतर तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पत्रकार संघाने अनधिकृत कंटेनर यार्ड बंद करण्याची मागणी लावून धरली होती. त्यावेळी उपस्थित वाहतूक शाखेचे गायकवाड यांनी वाहतूक कोंडी होत नसल्याचा दावा केला होता तो या निमित्ताने फोल ठरला असल्याचे दिसते. या सर्व बाबतीत लवकरच सिडको, जेएनपीटी, महसूल खाते आणि उरण तालुका मराठी पत्रकार संघाची संयुक्त बैठक लावणार असल्याचे आश्वासन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले आहेत. वाहतूक कोंडीतुन सुटका झाली नाहीतर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून दाद मागू असा इशारा उरण तालुका मराठी पत्रकार संघाने दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.