धाटाव औद्योगिक वसाहीतीमधील महावितरणच्या एकाही विद्युत रोहित्र डीपिला “ना कडी ना कुलूप”
सिटी बेल | रोहा | शशीकांत मोरे |
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहती अंतर्गत रस्त्यालगत असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत रोहीत्रच्या एकाही डीपीला “ना कडी ना कुलूप” अशी अवस्था असल्याने सताड उघड्या डीपी मुळे अपघाताचा धोका मात्र याठिकाणी कायमच असल्याचे पहावयास मिळत आहे.
दरम्यान महावितरण विभागाचे मात्र यागंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.जिवंत विद्युत वाहिन्यां मुळे रहदारीला भीतीदायक वातावरण निर्माण झाल्याने या परिसरातील नागरिकांचा व येथील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र राम भरोसे होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
धाटाव औद्योगिक वसाहती बरोबर लगतच्या गावातून विजेचा पुरवठा होण्याकरीता जागोजागी विजेचे रोहित्र उभारण्यात आले आहेत.मात्र वसाहतीतील जैंनवाडी नजीकच्या मुख्य रस्त्यावरील ज्या ठिकाणी महामंडळाचे काम सुरू आहे त्याठिकाणी दोन्ही बाजूकडील डीपी,एल्पे केमिकल कंपनी लगतची डीपी,रोहा तालुका क्रीडा संकुला समोर,एफ.डी.सी कंपनी लगतची डीपी तर एक्सेल स्टॉप वरील डीपीसह वसाहती लगतच्या विविध गावात असलेल्या डीपि भर रस्त्यावर आल्या असून वाहतुकीस अडचण होत आहे.त्यातच अवघ्या दीड ते दोन फूट अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावरील विद्यूत रोहित्र मुळे या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत.या परिसरात जेष्ठ नागरिक,लहान मुलांचा,कामगार वर्गाचा सतत वावर सुरू असल्याने याठिकाणी मनुष्यहानी होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.

तसेच वसाहतीसह ग्रामीण भागात रोहित्रांना विज महावितरणच्या वतीने बसविण्यात आलेले डीपीचे झाकणे गायब झाल्याने त्यातील विजेच्या फ्यूज व तारा उघडया पडल्या आहेत.त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विजेच्या डीपीमधील उघडया तारांमुळे अपघात घडण्याची शक्यता असतांना महावितरण विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
रोहित्राचे वसाहतीसह ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी विद्युत झाकणे तुटले असून ते उघड्या स्वरूपाचे आहे.या उघडया रोहित्रां जवळ लहान मुले खेळण्याकरीता गेली असता त्यांचा चुकून स्पर्श झाल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठिकठिकाणी असलेल्या उघडया डीपी म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळच सुरू आहे.एखादी जिवीतहानी झाल्यानंतरच संबधित विभागाला जाग येणार का?असा सवाल नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.संबंधित विभागाने विज रोहित्राच्या डीपी झाकण्यासाठी किंवा डीपी संरक्षणाच्या दृष्टीने सक्षम उपाययोजना केली पाहिजे.याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

दरम्यान वीज पुरवठा करणाऱ्या धाटाव औद्योगिक वसाहीतीमधील महावितरणच्या एकाही विद्युत रोहित्र डीपिला ना कडी ना कुलूप अशी बिकट अवस्था असल्याने आता महावितरण विभाग या गंभीर बाबीकडे किती जाणीवपूर्वक घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहा तालुका क्रीडा संकुलात खेळण्यासाठी सकाळी एमआयडिसीच्या रस्त्याने जात असताना वळणावरील व संकुलासमोरील उघड्या डीपीमुळे मनुष्यहानी होण्याची भीती आहे.याकडे संबंधित विभागाने जाणीवपूर्वक पाहणे गरजेचे आहे.
शार्दुल मोरे.
(विद्यार्थी,क्रीडा प्रेमी)
विद्युत पुरवठा होण्यासाठी विद्युत रोहित्र हे विद्युत पुरवठा विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या आहेत.गावात आणि वसाहतीत विद्युत डीपीच्या समस्या पाहावयास मिळते.यात उघडया स्वरूपाच्या डिपी, झाडे झुडपांनी गुरफटलेल्या डिपी,विद्युत रोहित्रांजवळील कचऱ्यांचे साम्राज्य मुख्य रस्त्यावरील रोहित्र मुळे रहदारीस अडथळा होत आहे. त्यांच्या देखभालीकडे विद्युत विभागाचे दुर्लक्ष दिसून येते.अशा विविध समस्याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून विद्युत डिपीच्या समस्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
महेंद्र रटाटे
नागरिक व कामगार.
वसुली सुरू असल्यामुळे काम करायला वेळ कमी पडत आहे,सबंधित काम जबाबदारीने करण्यासाठी कर्मचारी वर्गाला सांगणार आहे.गावांतील अडचणी सुद्धा लवकरात लवकर दून करण्यात येतील,तसेच ८ ते १० दिवसात डीपीची कुलूप,कड्या व ट्रान्सफॉर्मरच्या बॉक्स बाबतची समस्या मार्गी लावली जाईल.
बळीराम वाघमोडे
वरिष्ठ तंत्रज्ञ धाटाव विभाग (महावितरण कंपनी).








Be First to Comment