शिवसेनेला 1556 मते अन् 1993 सेनाविरोधी मतांची काँग्रेस,राष्ट्रवादी, भाजप, मनसे व अन्य पक्षांमध्ये विभागणी
विरोधी पक्षांकडून जनमताचा सपशेल अनादर
सिटी बेल | शैलेश पालकर | पोलादपूर |
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये पोलादपूरकरांना हवे असलेले परिवर्तन देण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अपयशी ठरल्याचे सकृतदर्शनी दिसून आले तरीही शिवसेनेचे यश हे केवळ भाजप आणि काँग्रेसमध्ये विभागलेल्या शिवसेनाविरोधी मतांमुळे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेविरोधात सर्वच पक्ष लढत होते हे जरी खरे असले तरी काही लढती भाजपने तर काही लढती काँग्रेसने मते खाल्याने अपयशी झाल्या तर एक आघाडीतील चक्क मैत्रीपूर्ण लढत शिवसेनेला बढत देणारी ठरल्याने अंतिम निकालात शिवसेनेची सरशी झाल्याचे दिसून आले. पहिल्या 13 मध्ये शिवसेनेला 7 व काँग्रेसला 6 जागा मिळाल्याने ही चुरस पुढे त्रिशंकू अवस्थेकडे वाटचाल करेल आणि निकाल दुसऱ्या टप्प्यातच निश्चित असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीचे भाकित सर्वात जास्त गांभिर्याने शिवसेनेने घेतले.

भाजपने या टप्प्यामध्ये काँग्रेसलाच काटशह दिल्याने शिवसेनेचा उधळलेला वारू रोकण्यात काँग्रेस अपयशी ठरली आणि पोलादपूरकर एकंदरित सत्तापरिवर्तनापासून अलिप्त राहिले. एकूण निकालाच्या आकडेवारीनुसार पोलादपूर शहरामध्ये शिवसेनेविरोधात तीव्र जनभावना असतानाही शिवसेनेविरोधातील विविध राजकीय पक्षांमध्ये समन्वय नसल्यानेच शिवसेनेची पुन्हा सत्ता बसणार असल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये 16 प्रभागांमध्ये उमेदवारी लढणाऱ्या शिवसेनेला 10 नगरसेवक व 1556 मते, 14 प्रभागांमध्ये लढणाऱ्या काँग्रेस पक्षाला 6 नगरसेवक व 1333 मते, 12 प्रभागांमध्ये लढणाऱ्या भाजपला 1 नगरसेवक व 423 मते, 4 प्रभागांत लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला 172 मते, 3 प्रभागांमध्ये लढणाऱ्या मनसेला 50 मते तर दोन अपक्षांना 15 अशा एकूण 1993 विरोधी मतांचे विभाजन शिवसेनेच्या फायद्याचे ठरले असले तरी सत्तांतराची मानसिकता ध्वनित करणाऱ्या जनमताचा अनादर विरोधी उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे झाल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर नगरपंचायतीची निवडणूक अपेक्षेपेक्षा एक वर्ष उशिराने झाली. कोरोना आणि नंतर प्रशासनाचे कारण सांगून विकासकामांना विलंब झाला. याचदरम्यान, शिवसेनेचे पाच नगराध्यक्ष आणि चार उपनगराध्यक्ष झाले होते. नगराध्यक्ष होण्याच्या लालसेतून शिवसेनेतील उमेदवार विजयासाठी ताकद लावणारे ठरतील, हा अंदाज काहीसी खरा ठरणारा आहे. याच कारणातून काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये पक्षांतर करणारे देखील तयार होतील, हे सूत्र मागील पाच वर्षांप्रमाणेच कायम राहणार आहे.

प्रभाग 1 मध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 96 मते मिळाली असताना या निवडणुकीत 0 मतदान करताना शिवसेनेने एकूण मतदानाच्या केवळ 18 टक्के म्हणजे 82 मतदान करून घेण्याचा प्रकार 471 मतदारांना मतदानापासून परावृत्त आणि उमेदवारांना प्रचारापासून प्रतिबंधित करण्याचा प्रकार लोकशाहीमध्ये गंभीर असूनही त्याकडे सहजतेने पाहिले गेल्याने शहरीकरणातील गावखाते याठिकाणी चालविले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभाग 2 मध्ये काँग्रेसचा केवळ 7 मतांनी हुकलेला विजय आणि भाजप उमेदवाराला 17 मते मिळणे, प्रभाग 4 मध्ये काँग्रेस उमेदवाराचा 23 मतांनी पराभव होणे आणि अपक्ष उमेदवारास 13 आणि भाजप उमेदवारास 39 मते मिळण्याने, प्रभाग 5 मध्ये मैत्रीपूर्ण लढतीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस उमेदवारांच्या बेरजेपेक्षा शिवसेनेच्या विजयी उमेदवाराची मते कमी असणे, प्रभाग 6 मध्ये भाजप उमेदवाराचा 19 मतांनी पराभव होणे आणि काँग्रेस उमेदवाराला 18 मते मिळणे, प्रभाग 10 मध्ये काँग्रेस उमेदवाराचा 13 मतांनी पराभव होणे आणि भाजप उमेदवाराला 13 मते मिळणे, प्रभाग 13 मध्ये आघाडीच्या उमेदवाराला 17 मते मिळणे आणि भाजप उमेदवार केवळ 8 मतांनी पराभूत होणे, प्रभाग 15 मध्ये काँग्रेसची मते अनाकलनीयरित्या ट्रान्सफर होणे, प्रभाग 16 मध्ये शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करण्यासाठी सहकार्याची मानसिकता करणाऱ्या कुटूंबातील तरूण मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेसोबत जाणे, शिवसेना विरोधी मतांची विभागणी झाल्यानेच याठिकाणी शिवसेनेची सरशी झाल्याचे दिसून येत आहे.
उर्वरित ठिकाणी प्रभाग 3 आणि 9मध्ये काँग्रेस आणि भाजप उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत काँग्रेसची सरशी होणे तर प्रभाग 3मध्ये शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर जाणे यातच प्रभाग 11 मध्ये थेट लढतीत काँग्रेसला 52 मतांची आघाडी मिळणे, प्रभाग 17 मध्ये शिवसेनेच्या शहरप्रमुखांच्या 9 मतांनी झालेल्या पराभवासोबतच काँग्रेस आणि मनसे यांना मिळालेल्या मतांची बेरीज 55 असणे हा मतदारांचा कौल शिवसेनेच्या विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व भाजप तसेच मनसे अशा सर्व पक्षियांनीच विचारात घेण्याची गरज आहे. सर्वच लढती एकाच टप्प्यात झाल्या असता या निवडणुकीचा निकाल पुष्कळसा जनमताचा आदर करणारा लागला असता. परंतू दुसऱ्या टप्प्यामधील निवडणूक ही जनमताला मारक ठरल्याचे एकूणच दिसून येत आहे. तूर्तास, आगामी पाचही वर्षे शिवसेनेची सत्ता निर्विवादपणे राहणार असून विकासकामांच्या बाबतीत विरोधीपक्ष किती आक्रमक राहिल, याबाबत विरोधीपक्षात सर्वच नवे चेहरे असल्याने साशंकता आहे.








Be First to Comment