नंदुरबार जिल्ह्यात ‘कोरोना’ तपासणीसाठी चाचण्यांची संख्या वाढवावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आढावा बैठकीत निर्देश
सिटी बेल | नंदुरबार | रामकृष्ण पाटील |
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने शहरी व ग्रामीण भागात (आरटीपीसीआर) चाचण्यांची संख्या वाढवावी. असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
‘कोविड-19’ पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, कोरोना संसर्ग वाढत असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून दररोज अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. कोरोना बाधितांची अधिक संख्या असलेल्या ठिकाणांची संपर्क साखळी शोधून बाधित व्यक्तींच्या निकटवर्तीयांच्या आरटीपीसीआर चाचणी करण्यावर भर द्यावा. बाधित परिसरात स्वॅब संकलनासाठी विशेष शिबिराचे आयोजन करावेत. खासगी व्यवसायिकांच्या ठिकाणी उपचारासाठी सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची माहिती घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांच्या नियमितपणे बैठका घ्याव्यात.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआर चाचणीची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावेत. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या लक्षणे असणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर किंवा रॅपिट ॲन्टिजन चाचणी करावी. स्वॅब संकलन करुन स्वॅबचे नमुने डाटा एन्ट्रीकरुन त्वरीत लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. भाजीपाला विक्रेते, दुकानदार,सलून चालक, गर्दीच्या ठिकाणाच्या व्यायसायिकांची कोरोना चाचणी प्राधान्याने करावी.
कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी, वारवांर हात धुवावे, मास्क वापरावा आणि सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी यावेळी केले. बैठकीस सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Be First to Comment