Press "Enter" to skip to content

स्व.रमेश कान्होजी डाऊर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे पत्रकारांचा यथोचित सत्कार

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

स्व.रमेश कानोजी डाऊर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त उरण तालुक्यातील पत्रकारांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन डाऊर यांनी सत्कार करून सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

गोरगरिब जनता व समाजावर होणारा अन्याय अत्याचाराविरूद्ध पत्रकार सातत्याने आवाज उठवित असतात. समाजातील भ्रष्टाचार नेहमीच ते बाहेर काढतात व दिनदुबळ्यांना न्याय देतात. त्यांच्या लेखणीत ताकद असल्याने अनेकांना न्याय मिळतो. अशा पत्रकारांचा सन्मान करणे हे आद्य कर्तव्य असून त्याच भावनेतून आज उरण परिसरातील पत्रकारांना सन्मानित केले असल्याचे सचिन डाऊर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षकनेते व जेष्ठ पत्रकार दा. चां. कडू गुरुजी, प्रमुख पाहुणे डॉ. सत्या ठाकरे, गुरव अण्णा, श्री संजीव पाटील, सौ. नीलम पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, संजय गायकवाड, घन:श्याम कडू, अजित पाटील, विरेश मोडखरकर, दिलीप कडू, अनंत नारंगीकर, पूजा चव्हाण, आशिष पाटील, सुयोग गायकवाड, दिनेश पवार, विठ्ठल ममताबादे आदींचा स्मृतिचिन्ह, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

शिक्षक नेते व जेष्ठ पत्रकार दा. चां. कडू गुरुजी यांनी आपल्या जीवनातील आजपर्यंत संघर्ष सांगत आताची पत्रकारिता व पूर्वीची पत्रकारिता यामधील बदल याचे सविस्तर माहिती उपस्थित पत्रकारांना दिली. त्यामुळे पत्रकारिता करीत असताना आपली विश्वासहर्ता जपणे याकडे पत्रकारांनी लक्ष देणे गरजेचे बनले असल्याचे सांगितले. तसेच स्वर्गीय रमेश कान्होजी डाऊर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधत त्यांचे चिरंजीव सचिन डाऊर यांनी पत्रकारांचा सत्कार केला याचे अभिनंदन करीत रमेशशेठ डाऊर हे राजकारणी असले तरी ते समाजकारणी जास्त होते. त्यांच्याकडे काम घेऊन गेलेला माणसांकडे कधी कोणत्या पक्षाचा आहे याची विचारणा न करता त्याचे काम कसे होईल याकडे त्यांचा जास्त लक्ष असे सांगितले.

डॉ. सत्या ठाकरे यांनी पत्रकारांच्या या कार्यक्रमाचे कौतुक करून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तसेच स्व. रमेश डाऊर सामाजिक प्रतिष्ठानला मदत करण्याचे आश्वासन दिले. रमेशशेठ डाऊर यांची कन्या नीलम पाटील यांनी पत्रकारांना समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे आयोजक सचिन डाऊर यांनी पत्रकार दिनाच्या पत्रकारांन शुभेच्छा देऊन स्व. रमेश कान्होजी डाऊर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करु तसेच सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील यांनी रमेशशेठ डाऊर यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची माहिती देऊन ग्रामपंचायत सरपंच ते जिल्हापरिषद अध्यक्ष असताना केलेल्या कार्याची माहिती दिली.

यावेळी पत्रकार संजय गायकवाड, विरेश मोडखरकर यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधत स्व. रमेश कान्होजी डाऊर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे पत्रकारांचा यथोचित सत्कार केल्याबद्दल समाधान व्यक्त करून सामाजिक प्रतिष्ठानला सहकार्य करू असे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.