Press "Enter" to skip to content

पालकमंत्री आदिती तटकरेंच्या आदेशाला केराची टोपली ?

नागोठणे गावातील शुध्द पाणी पुरवठा योजना रखडली जबाबदार कोण ?

सिटी बेल | याकुब सय्यद | नागोठणे |

पालकमंत्री आदिती तटकरें यांनी   नागोठणेतील जनतेच्या प्रेमापोटी शुद्ध पाणीपुरवठा योजने संदर्भात संपूर्ण शुद्ध पाणीपुरवठा योजनेत जातीने लक्ष घालून अधिकाऱ्यांना आदेश करून सुद्धा अधिकारी व ठेकेदार या बाबीकडे कानाडोळा करत आहेत. तीन महिन्यांत योजना सुरू करण्याचे पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला अधिकार्यांनी केराची टोपली तर दाखवीली नाही ना असा सवाल उपस्थित झाला आहे.

नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजना करिता लोकांचे हित पाहत १० वर्षा पूर्वी तत्कालीन मंत्री व सध्याचे रायगड जिल्हा व रत्नागिरी जिल्हाचे खासदार सुनील तटकरे यांनी नागोठणेकर नागरिकांना शुद्ध  पाणी  मिळावे म्हणून जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून मंजूर केलेली योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून संबंधित अधिकारी ठेकेदारांची बैठक घेवून  तीन महिन्यात ही योजना चालू करण्याचे आदेश  संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री आदिती तटकरे यांनी दिले असताना  मुदत संपली तरी शुद्ध पाणीपुरवठा योजना सुरू झालेली नाही. यामुळे या योजनेद्वारे मिळणारे पाणी नागोठणे करांच्या मुखी कधी लागणार त्यांच्या घरोघरी कधी पोचणार असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे.

तीन महिन्या पूर्वी सर्व संबंधित व ठेकेदारांची बैठक नागोठणे येथील शिव गणेश हॉल मध्ये घेत पालकमंत्र्यानी सज्जड ताकीद देऊनही अजून या योजनेचे पाणी नागरिकांच्या घरी पोहचू शकलेले नाही. या बैठकीत संबंधितांची कानउघडणी करताना पालकामंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले होते की, या प्रकरणी खासदार सुनील तटकरे यांनी लक्ष घातले तर काय होईल याची कल्पना करा असा  सज्जड आदेश या वेळी त्यांनी  संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिला होता पण त्यांचा काहीही परिणाम  संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर झालेला दिसून न आल्याने या प्रकरणी झारीतील शुक्राचार्य कोण ? अशी चर्चा नागोठणे येथील जनतेत होत आहे.

तीन महिन्या पूर्वी रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे हे घेतलेल्या बैठकीत पाणीपुरवठा योजनेवरून त्या अधिकाऱ्यांवर संतापल्या होत्या नागोठणे येथील जनतेच्या प्रेमाखातर खा. तटकरेंनी त्यावेळी विशेष बाब म्हणून मंजूर केलेल्या  कोट्याव रुपयांच्या या शुद्ध पाणी पाणीपुरवठा योजनेचे औपचारिक उद्घाटन १०
वर्षांच्या कालावधी पूर्ण झाल्या  नंतरही झालेले नाही,ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आत्तापर्यंत या योजनेचे पाणी नागरिकांना घरोघरी पोचायला पाहिजे होते. त्यामुळे
आता बस्स झाले असा संताप ही पालक मंत्री त्यावेळी  व्यक्त केला होता.. या तीन महिन्या पूर्वी झालेल्या या  योजनेचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा असा आदेश दिला होता.

योजनेची सर्व ८ कोटींची रक्कम ठेकेदरास मिळालेली असताना या योजनेच्या आराखड्यातील पाइप लाइन अजूनही सर्व घरापर्यंत पोचलेली नाही. टाकीला भेगा पडलेल्या आहेत.या साठी जी स्थानिक पाणीपुरवठा कमिटी बनविली गेली होती त्या पाणी पुरवठा कमिटीच्या सभासदांना ठेकेदार विश्वासात घेत नाहीत अश्या अनेक तक्रारी तीन महिन्या पूर्वी झालेल्या बैठकीत समोर आल्या होत्या .या बाबत आता तीन महिने उलटल्या नंतरही काम पूर्ण न झाल्याने पालक मंत्री आदिती तटकरे या अधिकारी ठेकेदारावर काय कारवाई करतात या कडे नागोठणेकरांचे लक्ष लागले आहे.यातील ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाते की नाही, तसेच संबधित अधिकाऱ्यानंवर कोणती कारवाई होते या सर्व प्रकरणी नागोठणेकराचे लक्ष लागले  आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.