Press "Enter" to skip to content

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत  

 पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील वलप ग्रामपंचायतीमध्ये बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रे तयार केल्याचा गंभीर बाब उघडकीस आली होती. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल कुणी या गंभीर विषयावर शासनाचे लक्ष केंद्रित केले. 

            वलप ग्रामपंचायतीच्या युजर आयडी व पासवर्डचा गैरवापर करून सुमारे २ हजार ६६० बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली असून सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्याअनुषंगाने किती आरोपींना अटक करण्यात आले व त्यांच्यावर कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले व सदर प्रकरणात बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या संबंधित दोषींवर कारवाई करण्यासह भविष्यात अशा घटना रोखण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ? असा तारांकित प्रश्न दाखल केला होता.           

या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि,  वलप (ता. पनवेल, जि. रायगड) ग्रामपंचायतीच्या नागरी नोंदणी प्रणाली (CRS) वरील Add Old Event या पर्यायाचा अवलंब करून डिजिटाइज्ड करण्यात आलेल्या जुन्या जन्म नोंदींची समीक्षा करतेवेळी २६६० जन्म नोंदी या बनावट असल्याचे माहे फेब्रुवारी, २०२६ मध्ये निदर्शनास आले. बनावट जन्म नोंदी रद्द करण्याबाबतची कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली. तसेच  पोलीस ठाण्यात प्रथम खबर अहवाल (FIR) रजि.क्र. ५१/२०२६ नोंदविला आहे. सदर प्रकरणी भा.न्या.सं. भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३३८, ३१८(४), ३३६ (३), ३४० सह, आय.टी. अॅक्ट कलम ४३, ६६ सी, ६६ (ड) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ०३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गुन्हे, पनवेल तालुका पोलिस ठाणे, नवी मुंबई यांचेमार्फत पुढील तपास व कार्यवाही सुरू आहे. तसेच de.crsorgi.gov.in ही ऑनलाईन संगणक प्रणाली वापरताना घ्यावयाची दक्षता व प्रणाली SOP (Standard Operating Procedure) अनुसार योग्यरीत्या हाताळण्याबाबत सर्व निबंधक जन्म-मृत्यू यांना वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांचे कार्यालयामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.