
पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची साहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती करण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे पोलीस दलात तसेच पनवेल परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व त्यांना नवी मुंबई आयुक्त कार्यालय येथे बढती देण्यात आली आहे.
नितीन ठाकरे यांनी आपल्या कारकीर्दीत पनवेल शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले. शहरात शांतता, सुरक्षितता आणि नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कठोर कार्यपद्धती, गुन्हेगारीविरोधातील आक्रमक भूमिका आणि तात्काळ निर्णयक्षमतेमुळे त्यांनी पनवेलमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्यकाळात अनेक किचकट आणि गाजलेल्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात पोलीस विभागाला यश मिळाले. तसेच पनवेल परिसरातील विविध गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात त्यांनी भरीव कामगिरी बजावली.
जनतेशी संवाद साधत विश्वासार्ह आणि कार्यक्षम पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी आपली छाप उमटवली. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील कारकीर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.




Be First to Comment