Press "Enter" to skip to content

घंटागाड्या असूनही कचरा रस्त्यावर

नगरपंचायतीकडे झेपावणाऱ्या पालीत घाण व कचऱ्याची समस्या गंभीर

घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याची हानी ; प्लास्टिक खाणाऱ्या गुरांचा जिव धोक्यात

सिटी बेल | पाली/बेणसे | धम्मशील सावंत |

अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तसेच नगरपंचायतीच्या दिशेने वाटचाल होत असलेल्या  पालीत कच-याची समस्या गंभीर झाली आहे. वर्षानुवर्षे कचऱ्याची समस्या  अधिक गंभीर बनतेय. शहरात नगरपंचायतीच्या घंटागाड्या फिरून देखील काही नागरीक फुटक्या कचरा कुंड्या आणि रस्त्यावर कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर येणारा कचरा नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरत आहे, तर कचरा कुंड्यात काही खाद्य मिळेल यासाठी गुरे कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्या खात आहेत, परिणामी गुरांच्या जीवितास ही धोका निर्माण झालाय. सांडपाण्याचा निचरा देखील योग्य पद्धतीने होत नसल्याची ओरड नागरिक करीत आहेत.

पालीतील कचरा समस्येवर मात करण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीतर्फे 4 वर्षांपूर्वी घंटा गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या.  सध्या नगरपंचायतीकडे 4 घंटागाड्या कार्यरत आहेत. या घंटा गाड्या येथील विविध भागात फिरून कचरा गोळा करतात. आठवड्यातून रविवारीच फक्त घंटा गाड्या येत नाहीत. त्यानंतर सोमवारी अनेक ठिकाणच्या कचरा कुंड्या व रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग पडलेला असतो. तर इतर दिवशी देखील हीच परिस्थिती पहायला मिळते. घंटागाडी कचरा घेऊन गेल्यानंतर झालेला कचरा काही दुकानदार तसेच अनेक जण घरात किंवा सोयटीमध्ये साठवून न ठेवता लागलीच कचरा कुंड्यांमध्ये व रस्त्यावर टाकतात. तर काहीजण दिवसभर घरी नसल्यास जमा झालेला कचरा आजूबाजूच्या कचरा कुंड्यांमध्ये किंवा रस्त्यावर टाकून देतात. परिणामी कचऱ्याची समस्या जैसे थेच राहते. यामुळे नागरिकांसह भाविकांचे आरोग्य देखिल धोक्यात आले आहे. भटके कुत्रे व जनावरे हा कचरा अस्ताव्यस्त करतात. तसेच गुरे-ढोरे व भटके कुत्रे यातून अन्न शोधण्यासाठी जातात आणि हा सर्व कचरा व घाण रस्त्यावर व बाजुच्या गटारात पडते. आणि गटारे तुंबून आणखी समस्या उद्भवते.

अपुरे सफाई कर्मचारी

पाली नगरपंचायतीकडे अधिकृत 15 ते 18 सफाई कर्मचारी आहेत. मात्र तुटपूंजा पगार व सेवासुविधांचा अभाव यामुळे प्रत्यक्षात जेमतेम ९-१० कर्मचारी रोज कामावर येतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येतो. परिणामी सर्वच ठिकाणची साफसफाई करणे त्यांना शक्य होत नाही.

आणखी घंटागाड्या हव्या

सध्या कचरा उचलण्यासाठी एक ट्रॅक्टर व दोन छोटा हत्ती घंटा गाड्या व एक ऍपे आहेत. यातील एक घंटागाडी छोटी व बंदिस्थ आहे. त्यामुळे तिच्यात अधिक कचरा सामावत नाही. तसेच पालीचा विस्तार वाढत असल्याने अधिकच्या घंटागाड्यांची आवश्यकता आहे.

पालीत घंटागाडी नियमित फिरत असून सुद्धा काही नागरिक नादुरुस्त कचरा कुंड्यामध्ये व रस्त्यावर आपला कचरा टाकतात. परिणामी कोरोना काळात आजारांना निमंत्रण देतात. घंटागाडी असताना कचरा कुंडी ची गरजच नाही. नगरपंचायतीने नागरिकांना घंटा गाडीचा वापर करण्यासाठी जनजागृती व नियोजन करावे. तसेच डंपिंग ग्राउंड सुद्धा बंदिस्त असावे.

कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली

नजीकच्या काळात पालीतील सर्व कचराकुंड्या बंद करणार आहोत. त्यामुळे नागरिकांनी घंटागाडी मध्येच कचरा टाकावा. कचरा कुंडीत कचरा टाकला तरी तो बाहेर पडू देऊ नये. नागरिकांनी शिस्त पाळण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून गाव स्वच्छ व सुंदर राहील. नागरिकांनी देखिल योग्य कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच स्वच्छतेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे.

दिलीप रायण्णावार, प्रशासक, पाली नगरपंचायत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.