Press "Enter" to skip to content

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत श्वसनसंस्था जपण्याचे डॉक्टरांचे आवाहन

सर्दी- ताप व ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या समान लक्षणांमुळे नागरिक संभ्रमात

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतर मुंबईसह लगतच्या शहरांमध्ये तिसऱ्या लाटेचा शिरकाव झाला असून नागरिकांनी श्वसनसंस्था जपण्याचे आव्हान केले आहे. देशाचे कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये नव्याने आढळत असलेल्या करोना बाधित रुग्णांपैकी ७५ टक्के रुग्ण हे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे असल्याचे वृत्त  हाती आले असून ही तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे असे मानण्यास हरकत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे नाक कान घसा तज्ञ व शल्यचिकीत्सक डॉ. भाविक शाह म्हणाले , “पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या  लाटेमधे आपण सर्वानी श्वसन संस्था म्हणजेच नाक कान व घसा जपण्याचे प्रयत्न केले पाहिजे कारण या लाटेमधे आपल्या  फुफ्फुसांवर जास्त परिणाम होत नसून घसा दुखणे , खवखवणे , नाक वाहने तसेच नाकाला सूज येणे अशी लक्षणे दिसून येत आहेत, ही सर्व लक्षणे सर्दी किंवा थंडीमुळे देखील दिसू शकतात, दोन दिवसापेक्षा अधिक काळ हि लक्षणे दिसली तर आरटी-पीसीआर चाचणी करण्याची आणि लोकांपासून अंतर राखण्याची गरज भासू शकते तसेच चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत अशा लोकांना क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

 श्वसन संस्थेला हवेचा पुरवठा करण्यासाठी नाकापासून सुरुवात होते. घशात स्वरयंत्रापासून श्वासनलिका सुरू होते. नाक, घसा व स्वरयंत्र यांना बाह्य श्वसनसंस्था आहेत; त्याखाली श्वासनलिकेपासून फुप्फुसा पर्यंत आतली श्वसनसंस्था असते. आपल्या श्वसन संस्था या खुपच नाजूक असतात त्यामुळे इंटरनेटवरील उपायांपासून दूर राहणे अधिक  हितकारक आहे कारण  अनेक नागरिक घसा बरा करण्यासाठी विविध प्रकारचे चाटण अथवा काढे घेतात  व त्याच्या  दुष्परिणामामुळे  अथवा ऍलर्जीमुळे घशाला इन्फेकशन होऊ शकते अनेक नागरिक घशामध्ये बोटे घालून उलटी करण्याचा प्रयत्न करतात ते सुद्धा या काळात थांबविले पाहिजे.” ओमिक्रॉनची सध्या तरी विशेष लक्षणे दिसून येत नाहीत परंतु ओमिक्रॉन झालेल्या नागरिकांनी  उलट्या होणे आणि भूक न लागणे. तर काहींना सौम्य ताप, उलट्या, घसा खवखवणे आणि डोकेदुखीची तक्रार केली होती.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, अनेक देशांमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या संसर्गामागे ओमिक्रॉन व्हेरिएंट कारणीभूत ठरल्याचे म्हटले जाते. या बाबतीत त्याने डेल्टालाही मागे टाकले आहे. यात ओमिक्रॉन दोन ते तीन दिवसांत संसर्गाची प्रकरणे दुप्पट होत आहेत. वातावरण बदलांमुळे सुद्धा अनेक नागरिकांना सर्दी – खोकला घसादुखी व तापाची लक्षणे आढळून येत असल्यामुळे आपल्याला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग तर झाला नाही ना अशी शंकेची पाल अनेक नागरिकांच्या मनात चुकचुकत आहे.

याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे फुप्फुसरोगतज्ञ  डॉ अभय उप्पे  म्हणाले, सध्या वातावरणात धुरक्याचे ( विषारी धूर व धूळ यांचे मिश्रण ) प्रमाण वाढीस लागले असून याचा थेट परिणाम तुमच्या घश्यावर होतो. अनेक नागरिक मॉर्निंग वॉक  करून घरी आल्यावर घसा बसल्याची तक्रार करतात. सध्या वातावरणात धुळीचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क घालणे गरजेचे आहे. वायू प्रदूषण, धूळ, प्लास्टिक जाळल्यामुळे होणारा धूर तसेच वाहनातून निघणारा धूर नागरिकांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. जेष्ठ नागरिक व लहान मुलांमध्ये  श्वसनविकार वाढल्याचे समोर आले आहे. श्वसनयंत्रणेला काही आजार अथवा इन्फेकशन झाले तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.