गव्हाण – न्हावा – जासई ग्रामपंचायत हद्दीतील गावांचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा : अदितीताई तटकरे
सिटी बेल | उरण | घनश्याम कडू |
गेली 2 महिने उरण -पनवेल तालुक्यातील न्हावा, न्हावा खाडी, गव्हाण, कोपर, शिवाजीनगर, जासई , बेलपाडा, शेलघर या गावांना ऐन हिवाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना सिडकोच्या मोघलाई धोरणामुळे सहन करावा लागत आहे. यामुळे हजारो महिला संतप्त झालेल्या आहेत. या संदर्भात रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मागणीनुसार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांनी आज एमआयडीसी, नवीमुंबई महानगर पालिका अधिकारी व सिडको अधिकारी यांची उच्चस्तरीय बैठक. खासदार सुनिल तटकरे व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थिती बोलावली होती. सदर बैठकीला गव्हाण, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
एमआयडीसी रानसई धरणातून 1980 सालापासून म्हणजे 30ते 40 वर्षापासुन या सर्व गावांना सुरळीत पाणी पुरवठा होत होता. परंतु सिडकोच्या नाकर्तेपणामुळे येथील प्रकल्पग्रस्त गावांच्या सर्व नागरी सुविधा जाणीवपूर्वक गिळंकृत करून येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे जिणे मुश्किल केले आहे.

एमआयडीसीचा पाणीपुरवठा या ठिकाणी सुरळीत चालु होता परंतु सिडकोने, एमआयडीसी, नवी मुंबई महानगर पालिका यांच्यात पाणी वाटप करार झालेला आहे. या करारामुळे नाहक या गावांचा व ओएनजीसीचा पाणी खंडित करण्यात आला. या प्रश्नांची गंभीर दखल घेत पालकमंत्री आदितीताई तटकरे व खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला. तुमच्या सावळ्या गोंधळामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त पाण्यासाठी वंचित असता कामा नये. तातडीने न्हावा, गव्हाण, जासई ग्रामपंचायत हद्दीतील गावांचा व भविष्यात सिडको हद्दीतील वाढणाऱ्या लोकसंख्येला मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी येत्या जानेवारी महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पातळीवर अधिकाऱ्यांची बैठक बोलावुन रानसई धरण, बाळगंगा, पुनाडे धारणाच्या पाणी साठ्याबद्दल चर्चा करून त्यावर उपाययोजना आखण्यात याव्या असे सांगितले.
या बैठकीला रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे, खासदार सुनिल तटकरे, रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र घरत, सिडकोचे जीएमडी कैलास शिंदे, नवीमुंबई महानगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, गव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. माई भोईर, विजय घरत, जितेंद्र म्हात्रे या बैठकीला उपस्थित होते.








Be First to Comment