उरण शिक्षक सहकारी पतपेढी च्या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलचा दणदणीत विजय
सिटी बेल | उरण |
उरण शिक्षक सहकारी पतपेढी च्या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनल ने शिक्षक महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय संपादित केला. रविवार दिनांक 26 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनल ने 15 पैकी 15 जागा जिंकून दैदिप्यमान यश प्राप्त केले. परंतु मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा आधार घेत अत्यंत चुकीची व दिशाभूल करणारी बातमी अग्रगण्य दैनिकात छापून आल्याने या निवडणुकीला भलताच रंग प्राप्त झाला.
स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलचे वतीने सुभाष हिरा भोपी, जयदास घरत आणि नरेश मोकाशी यांनी संयुक्तपणे पत्रक प्रसिद्ध करून सदर बातमी अत्यंत खोडसाळ आणि वाचकांची दिशाभूल करणारी असल्याचे प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. सदर बातमीत कोकण शिक्षक मतदार संघाचे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे आमदार बाळाराम पाटील यांना धक्का बसला असल्याचे कपोलकल्पित छापले आहे. या संघटना शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी लढत असतात. त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी अर्थाअर्थी संबंध नाही. मुळात निवडणूक जाहीर झाल्यानंतर या दोन्ही संघटनांनी शिक्षकांचे प्रतिनिधी या नात्याने आमदार बाळाराम पाटील यांचे आशिर्वाद घेतले होते. आमदार बाळाराम पाटील यांनी दोन्ही संघटनांना सारखेच आशीर्वाद दिले होते व केलेल्या कामाच्या जोरावर निवडणूक लढवावी अशी सूचना केली होती.
सदर बातमीदाराने स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनल यांस पनवेलच्या भाजपच्या आमदारांचे छुपे पाठबळ असल्याचे नमूद केले आहे. हे अत्यंत खोडसाळ वृत्त असल्याचे संघटनेच्या प्रवक्त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्रसिद्ध पत्रकात पुढे असे म्हटले आहे की पतपेढीत गेली पंधरा वर्षे हे पॅनल अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असल्याने शिक्षक सदस्यांनी त्यांच्यावरती भरघोस मतदानाचा वर्षाव केला. सदर पॅनल ने बहुसंख्य सभासदांच्या हितासाठी पनवेल येथे शाखा सुरू केली, मयत सभासदास संपूर्ण कर्ज माफी योजना यशस्वीपणे राबविली, संस्था संपूर्ण कर्ज मुक्त केली, कर्ज मर्यादा वाढवून व्याजदर कमी केला. या आणि अशाच अनेक विधायक कामामुळे स्वाभिमानी शिक्षक मित्र फायनल भरघोस मतांनी विजयी झाले.
स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनल गेली अनेक वर्षे शिक्षकांची विविध कामे करत आहेत. कोरोना काळात देखील शिक्षकांशी कायम संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा या संघटनेने सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यांच्या पदरात पडलेले विजयाचे दान हे त्यांनी केलेल्या उत्तम कार्याची पावती म्हणावी लागेल. परंतु प्रसिद्धी माध्यमांच्यात खोडसाळ व वाचकांची दिशाभूल करणारे वृत्त आल्याने संघटनेने वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसिद्धी पत्रकांच्या द्वारे माध्यमांना अवगत करून “त्या” वृत्ताचे खंडन केले आहे.







Be First to Comment