आज एका दिवसात सुमारे चार हजार वैयक्तिक आणि अनेक ग्रामपंचायतींनी नोंदविल्या आपल्या हरकती
सिटी बेल | उरण | अजित पाटील |
उरणच्या पुर्व भागात येऊ घातलेले खोपटा नवं नगर म्हणजे सिडकोच्या पदराआडून बड्या भांड्वलदारांसाठी पायघड्या पसरण्याचीच सिडकोची चाल असल्याची खात्री झाल्याने उरणच्या पुर्व भागातून सिडकोच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जोरदार विरोध होऊ लागला आहे. त्याचाच प्रत्यय म्हणून उरणच्या पुर्व भागातून आज चार हजार शेतकऱ्यांनी आपल्या वयक्तिक हरकती या प्रकल्पाच्या विरोधात सिडकोच्या मुख्य नियोजनाकारांच्या कार्यालयात नोंदविल्या आहेत. त्याचबरोबर अनेक ग्रामपंचायतींनी ही आपले या प्रकल्पाच्या विरोधातील ग्रामसभेचे आणि ग्रामपंचायतीचे ठराव दाखल केले असल्याने खोपटा नवे नगर म्हणून उरणच्या पुर्व भागात हातपाय पसरू पाहणाऱ्या सिडकोच्या इराद्यांवर कोलदांडा पडण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना हा प्रकल्प कोणत्या दृष्टीने फायद्याचा आहे याचा कोणताही उलगडा न करता सिडकोने आपला हा जुना प्रकल्प येथील शेतकऱयांवर लादण्याचा प्रयत्न चालविला आहे त्यामुळेच येथील शेतकरी वर्गात या प्रकल्पाच्या विरोधात कमालीचा संताप असून त्याचा प्रत्यय आज हरकती नोंदविण्याच्या उच्चांकाने आणून दिला आहे.
सिडकोने उरणच्या पुर्व भागाचा खोपटा नवे नगर म्हणून एक विकास आराखडा तयार करण्याचे घाटले आहे . मात्र हा विकास आराखडा सिडको करणार म्हणजे नेमके काय करणार याचा कोणताही बोध सध्यातरी होत नाही. त्याचप्रमाणे सिडकोने ३२ गावांपैकी ज्या सहा गावांचा यापूर्वीच विकास आराखडा केला आहे तेथे कोणत्याही सुविधा आज तरी दिलेल्या नाहीत. त्यातच शासनाने 1994 पासून या संपूर्ण भागात सातत्याने झोन बदली केले आहेत. 1994 ला या ठिकाणी खोपटा नवे नगर आणले त्यानंतर पुन्हा या ठिकाणी सिडको प्लानींग ऍथोरिटी म्हणून येण्याची स्वप्ने बघत होती. त्यानंतर याच जमिनीवर अंबानींचा सेझ लादण्याचा प्रयत्न शासनाच्या कडून करण्यात आला मात्र तो प्रयत्न येथील शेतकऱ्यांनी लोकनेते दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील रस्त्यावरच्या आणि न्यायालयीन लढाई लढून हाणून पाडला.
आत्ता पुन्हा एकदा शासनाच्या जुन्या आराखड्याचा हवाला देत सिडको या जमिनीचा तथाकथित विकास करू पाहत आहे. मात्र सिडकोने सिडको संपादित 95 गावांचा काय विकास केला हे येथील जनतेला चांगलेच माहीत आहे. नैना क्षेत्रात शेतकऱ्यांच्या हाती कसा धतुरा देण्याचा सिडकोचा डाव आहे ते ही आता जनतेपासून लपून राहिलेले नाही या पार्श्वभूमीवर आम्हाला सिडको नकोच त्यांनी केवळ यायचे असल्यास प्लानिंग ऍथॉरिटी म्हणून यावे मात्र आमच्या एक इंच जमिनीही सिडकोला ना देण्याचा विडा येथील शेतकऱयांनी उचलला आहे न. त्यातून मागील काही दिवसांपासून सिडकोच्या मुख्य नियोजनकारांच्या कार्यालयात सिडकोच्या खोपटा नवे नगर प्रकल्पाला असलेल्या हरकती दाखल करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
या हरकती दाखल करण्याच्या कार्यक्रमाचा आज उच्चाक झाला असून आज एका दिवसात उरणच्या पुर्व भागातील सुमारे चार हजार शेतकऱयांनी सिडकोच्या खोपटा नवे नगर प्रकल्पाला हरकती नोंदविल्या आहेत. सिडकोने उरणच्या पूर्व भागातील दिघोडे, चिरनेर, कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली , खोपटे,पाणदिवे,पिरकोन,आवरे,पाले,गोवठणे,सारडे ,वशेणी,पुनाडे आदी गावांच्या परिसरातल्या जमिनींचा कथित विकास करण्याचे ठरविले आहे ! मात्र सिडकोच्या या कथित विकासाला येथील शेतकऱ्यांचा कडवा विरोध आहे. त्या अनुषंगाने सिडको आणि वेळ पडल्यास शासनाशी दोन हात करण्याची तयारी उरणच्या पुर्व भागातील नागरिकांनी चालविली आहे त्याचाच एका भाग म्हणून या हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
त्यावेळी कोप्रोलीच्या सरपंच श्रीमती अलका म्हात्रे , उपसरपंच विपूल म्हात्रे , आवरेच्या सरपंच श्रीमती निराबाई पाटील , केळवणे गावाचे सरपंच संदिप घरत यांच्यासह रूपेश पाटील, गुरूनाथ गावंड, विश्वनाथ म्हात्रे , चंद्रशेखर ठाकूर , रोशन पाटील , प्रकाश पाटील , सुधाकर पाटील आदींनी सिडको मुख्य नियोजनकार (नैना) बेलापूर, नवी मुंबई यांच्या कार्यालयात जाऊन खोपटे नवनगर प्रकल्पास विरोध म्हणून सुमारे चार हजार वैयक्तीक हरकती दाखल केल्या आहेत.








Be First to Comment