बेकायदेशीर कंटेनर यार्ड बंद करण्याची उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी ; तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची लवकरच बैठक लावण्याचे आश्वासन
सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
राज्य महामार्ग 54 आणि राष्ट्रीय महामार्ग 4 ब लगत अनेक बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामे उभी राहिली आहेत. या अनधिकृत कंटेनर यार्डच्या बाहेर भर रस्त्यावर अवजड वाहने उभी केली जात आहेत. यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत, तर कित्येकजण जखमी झाले आहेत. तरी असे जिवघेणे अनधिकृत कंटेनर यार्ड त्वरित बंद करण्यात यावे. अन्यथा येत्या प्रजासत्ताक दिन दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी लाक्षणिक उपोषण अटळ आहे. अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे करून त्यांना या संदर्भात पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी या संदर्भात लवकरच बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या या बेकायदा कंटेनर यार्ड आणि गोदामांची केवळ यादी तहसील कार्यालयाकडून दिली जात असली तरीही अशा बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामांवर प्रत्यक्ष कारवाई मात्र होताना दिसत नाही. या बेकायदेशीर गोदामे तसेच यार्डकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसल्याने या यार्ड व गोदामांशेजारील रस्त्यांच्या मार्गांवर दोन लेनमध्ये अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग केली जात असल्याचे नेहमीच दिसून येत आहे आहे. ज्यामुळे या मार्गांवर वाहतूक कोंडी होत असते. त्याचप्रमाणे वाढत्या अपघातांनाही ही बेकायदा पार्कींग सातत्याने कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. अशा काही गोदामांच्या परिसरात तर गावगुंडांकडून अवैधरित्या रस्त्यांवरच वाहनतळे निर्माण झाली आहेत जी वाहतूक कोंडी आणि अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.
राज्य महामार्ग 54 आणि राष्ट्रीय महामार्ग 4 ब या रस्त्यांलगत असलेले सर्व्हिस रोड महामार्गांलगत असणार्या गावांना जोडण्यासाठी बनवण्यात आले आहेत. या मार्गावरून अवजड वाहानांना वाहतूक करता येत नाही. मात्र सर्व्हिस रोडचा वापर बेधडकपणे अवजड वाहने करत आहेत. यामुळे होणार्या अपघातांमध्येे सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या सर्व प्रकरणांची जड कशात आहेत तर ती हे सर्व बेकायदा कंटेनर यार्ड आणि गोदामांमध्ये आहे असे दिसून येत आहे. त्यामुळेच “ ना रहेगी बासुरी ना रहेगा बाज” या उक्तीप्रमाणे वाढते अपघात, वाहतूक कोंडी आदी प्रकारांना कारणीभूत असलेल्या आणि आपल्या कार्यालयाच्या यादीनुसार मुळातच बेकायदेशीर असलेल्या उरण तालुक्यातील सर्वच बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामे तात्काळ बंद करण्यात यावीत अशी पत्रकार संघाची मागणी आहे.
पत्रकार संघाच्या मागणीनुसार संबंधित बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामे यांच्यावर तातडीने कारवाई करून ती सर्व बंद न केल्यास नाईलाज म्हणून आम्ही खाली सह्या करणारे उरण तालुक्यातील पत्रकार उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने येत्या “प्रजासत्ताक दिनी” म्हणजे दि.26 जानेवारी 2022 रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहोत याची नोंद घ्यावी. या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणानंतरही प्रशासनावर कोणताही फरक न पडल्यास आम्हाला पुढील निर्णय म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना या आंदोलनात उतरवून आणखीन तीव्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी. आमच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणामुळे उद्भवणार्या परिस्थितीला सर्वस्वी तहसील कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी आपण लवकरात लवकर संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग व यार्ड मालक यांची तुमच्याबरोबर बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन उरण तालुका मराठी पत्रकार संघाला दिले. यामध्ये सकारात्मक मार्ग निघालातर बेहत्तर अन्यथा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२२ रोजीचे लाक्षणिक उपोषण अटळ असल्याचे पत्रकार संघाने सांगितले
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, संजय गायकवाड, अजिती पाटील, विरेश मोडखरकर, दिलीप कडू, पंकज ठाकूर, प्रवीण कोलापटे, पंकज ठाकूर, आशिष पाटील, सुयोग गायकवाड, विशाल गाडे, पूजा चव्हाण आदी उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रत अधिक माहितीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यात आल्या आहेत.








Be First to Comment